मुंबई: वडाळ्यात विद्युत ट्रान्सफार्मर जळून खाक, टपरीसह तीन घरांचे नुकसान 

मुंबई: वडाळ्यात विद्युत ट्रान्सफार्मर जळून खाक, टपरीसह तीन घरांचे नुकसान 

धारावी : पुढारी वृत्तसेवा : बेस्टच्या वडाळा पूर्व संगमनगर येथील ११ केव्हीची क्षमता असलेल्या उच्च दाबाच्या उपकेंद्रातील विद्युत ट्रान्सफार्मर भीषण आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेमुळे संगमनगर, हिम्मत नगर, दिन बंधू नगर, भरणी नाका परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली. त्यातच अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहचण्यास उशीर झाल्याने संपूर्ण वीज उपकेंद्र अवघ्या काही मिनिटातच  भस्मसात झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या आगीत उपकेंद्रासमोरील दिव्यांगाचा स्टॉल व तीन घरांच्या छपराचे नुकसान झाले. प्रत्यक्षदर्शी खादिम हुसेनच्या म्हणण्यानुसार काल रात्री संगमनगरमधील वीज उपकेंद्रात शॉटसर्किट होऊन अचानक आग लागल्याने धूर निघू लागला. येथील तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाला घटनेची माहिती देत  आरडाओरड करत उपकेंद्रालगत राहणाऱ्या रहिवाशांना तत्काळ घराबाहेर काढले. संपूर्ण परिसर मोकळा करण्याचा प्रयत्न केला.

अचानक उपकेंद्रातील दोन ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन आग भडकली. तीन मोठ्या स्विचने पेट घेताच संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. त्यातच वीज उपकेंद्राचे लोखंडी शटर निखळून पडल्याने आगीचा भडका उडाला. आग लगतच्या घरांच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत लागल्याने लगतच्या काही  छपराने पेट घेतल्याने रहिवाशांची  पाचावर धारण बसली. दरम्यान, अग्निशमन दलाने रात्री उशिरा आग आटोक्यात आणली. पहाटेपर्यंत कुलिंग ऑपरेशन सुरु होते. वीजपुरवठा खंडित झाल्याने रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news