.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : मुंबई महापालिका आपल्या रुग्णालयांत दाखल १६०० रुग्णांना दररोज अन्न पुरवठा करते. याबाबत प्रशासनाने कंत्राटदारांना आता नवीन अटी घातल्या आहेत. यात निकृष्ट अन्न पुरवठा केल्यास पाचपट दंडासह दंडासह अन्न तीनपेक्षा जास्त वेळा असुरक्षित आढळल्यास अनामत रक्कम जप्त करण्याबरोबर करार रद्द केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
महापालिके निविदापूर्व प्रशासनाने कंत्राटदारांशी चर्चा केली. यात अटीशर्ती मान्य असतील तरच निविदाप्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. गुणवत्ता राखण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
महापालिका दररोज सुमारे १,६०० रुग्णांना नाश्ता, चहा आणि सकाळ आणि संध्याकाळचे जेवण पुरवते. ज्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, मीठ नाही, मर्यादित मीठ आणि आरटी फीड असलेल्या अशा रुग्णांचा समावेश आहे. कंत्राटदारांनी कस्तुरबा रुग्णालय परिसरात अन्न शिजवण्याची परवानगी आणि ४२ आठवड्यांच्या अनिवार्य बँक हमीमध्ये शिथिलता यासारख्या मागण्या केल्या. मात्र पालिकेने त्या नाकारल्या.
अन्न सुरक्षा चाचणी अनिवार्य
एफडीए किंवा एफडीए-मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत अन्न सुरक्षा चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. पालिका अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे नमुने गोळा करून चाचणीसाठी पाठविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. चाचणीचा संपूर्ण खर्च कंत्राटदाराला करावा लागणार आहे.
जर कंत्राटदाराने वेळेवर अन्नपुरवठा केला नाही, तर रुग्णालयांना जवळच्या केटरर्सकडून अन्न ऑर्डर करण्याची परवानगी असेल. अशा परिस्थितीत, कंत्राटदाराकडून १५ टक्के पर्यवेक्षण शुल्क वसूल केले जाणार आहे.