

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय कामकाजात अडथळा दूर करण्यासाठी तसेच सभागृहात सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपल्याकडील महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी आपल्या पक्षातील मंत्री उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई यांच्याकडे सोपवली आहेत. या संदर्भातील पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, गृहनिर्माण आदी महत्त्वाची मंत्रालये आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांतील कामकाजाचा ताण मोठा असतो. विशेषतः सभागृह नेते म्हणून विधानपरिषदेत उपस्थित राहून विधेयके, प्रश्नोत्तरांचा तास आणि चर्चांना प्रतिसाद देणे आवश्यक असते.
त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये आणि विभागनिहाय निर्णयप्रक्रिया सुरळीत राहावी, यासाठी शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी मंत्री दादा भुसे, नगरविकास विभागाची मंत्री उदय सामंत, तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे सोपवली आहे.
संबंधित मंत्री अधिवेशन काळात या खात्यांचे प्रभारी मंत्री म्हणून काम पाहतील आणि सभागृहात विभागांशी संबंधित प्रश्नांना उत्तरे देतील, असे विधानसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.