

मुंबई :अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा मोहम्मद सलीम इक्बाल कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट याच्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दक्षिण मुंबईतील डोंगरी येथील लॅम्बट इमारत जप्त केली आहे. याशिवाय बांधकाम व्यावसायिक अस्लम अब्दुल रहमान पटणी आणि अन्य आरोपींच्या बँक खात्यांमधील ठेवीही जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे एकूण मूल्य सुमारे चार कोटी रुपये असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ईडीच्या तपासानुसार, सलीम फ्रूट याने दाऊद इब्राहिम टोळीच्या नावाने धमक्या देऊन आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे डोंगरीतील मालमत्ता बळकावल्याचा आरोप आहे. ही मालमत्ता त्याची पत्नी शाझिया सलीम इक्बाल कुरेशी हिच्या नावावर करण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
ईडीच्या आरोपानुसार, बांधकाम व्यावसायिक अस्लम पटणी याने २०१९ मध्ये यास्मिन मोहम्मद अहमद आणि दिवंगत शेरझादा जुंगरेझ खान यांच्या मालकीच्या लॅम्बट इमारतीतील ५० टक्के हिस्सा दाऊद इब्राहिम आणि सलीम फ्रूट यांच्या नावाने धमक्या देऊन मिळविला. या व्यवहारात मूळ मालकांना कोणतीही रक्कम न देता त्यांच्या मालकीच्या हिश्शापासून वंचित करण्यात आल्याचा आरोप आहे.
त्यानंतर पटणी याने ही इमारत सलीम फ्रूटची पत्नी शाझिया हिच्याकडे हस्तांतरित केल्याचे ईडीच्या तपासात नमूद करण्यात आले आहे. बेकायदेशीररीत्या मिळविलेल्या मालमत्तेला कायदेशीर व्यवहाराचे स्वरूप देण्यासाठी टप्प्याटप्प्याने व्यवहार केल्याचा संशय तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.
या कारवाईमुळे मुंबईतील अंडरवर्ल्डशी संबंधित मालमत्ता व्यवहार आणि खंडणीच्या पैशातून निर्माण झालेल्या कथित बेनामी मालमत्तांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ईडीकडून या व्यवहारांमधील आर्थिक स्रोत आणि अन्य संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे.
या प्रकरणात शब्बीर अहमद हसन करोलिया आणि युसूफ अहमद हसन करोलिया यांनी मूळ मालकाची तोतयागिरी करून मालमत्ता बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्याचा कट रचल्याचा ईडीचा आरोप आहे. त्यासाठी मालमत्तेच्या हस्तांतरणाशी संबंधित दस्तऐवजांसह बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यानंतर ही मालमत्ता सलीम फ्रूटच्या पत्नीच्या नावावर हस्तांतरित करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारे सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेतील एका व्यावसायिकाने आपल्या वडिलांच्या मालमत्तेवर नातेवाइकांनी सलीम फ्रूटच्या मदतीने बेकायदेशीर ताबा मिळविल्याची तक्रार केली होती.
२०१६ मध्ये २५ कोटींचे मूल्य
उमरखाडी येथील संबंधित इमारतीची २०१६ मध्ये अंदाजे २५ कोटी रुपये किंमत होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वडिलांचे २००६ मध्ये निधन झाले होते. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतरही मालमत्तेच्या व्यवहारासाठी त्यांच्या स्वाक्षरीचा बनावट वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. २०११ मध्येच मालमत्तेची विक्री झाल्याची माहिती कुटुंबीयांना २०१६ मध्ये मिळाली.