

मुंबई : विवेक कांबळे
घरात दररोज लागणारे धान्य, किराणा किंवा इतर छोट्या-मोठ्या वस्तू तुम्हाला थेट ड्रोनद्वारे घरपोच मिळाल्या तर? छान वाटेल ना? हा केवळ कल्पनाविलास नव्हे, तर हे आता खरंच शक्य आहे. मुंबईत लवकरच दैनंदिन गरजेच्या, पॅकेज्ड आणि ई-कॉमर्स वस्तूंची ड्रोनद्वारे घरपोच डिलिव्हरी केली जाणार आहे.
मुंबईतील गृहसंकुलांमध्ये ठरवून दिलेल्या ठिकाणी ड्रोन्सच्या माध्यमातून थेट वस्तू पोहोचविल्या जाणार आहेत. वर्ष 2026 मध्ये वडाळ्यातील गृहसंकुलांपासून याची सुरुवात होणार आहे.10 किलोपर्यंत वजनाच्या वस्तू घेऊन 60 सेकंदात 1 किलोमीटर अंतर कापण्याची प्रत्येक ड्रोनची क्षमता असेल.
एआय आधारित मार्ग नियोजन प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांना जलद, सुरक्षित आणि अखंड डिलिव्हरी सेवा देणे शक्य होणार आहे. शाश्वत शहरी जीवनशैलीला पूरक अशा या स्मार्ट लॉजिस्टिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विशेषतः दैनंदिन गरजेच्या वस्तूंची संपर्करहित आणि सोयीस्कररीत्या डिलिव्हरी करणे शक्य होणार आहे.
वाहतूक कोंडीवर पर्यावरणपूरक पर्याय
मुंबईच्या रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर होणारे कार्बन उत्सर्जन या दोन्ही समस्यांवर हा एक उत्तम पर्यावरणपूरक पर्याय ठरू शकतो. वेळ आणि इंधनाचीही यातून मोठी बचत होईल.
दिल्ली, बंगळूरूत प्रयोग यशस्वी
दिल्ली-एनसीआर आणि बंगळुरू या शहरांमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरला असून दरमहा हजारो वस्तूंची डिलिव्हरी येथे केली जात आहे. मुंबईतदेखील लवकरच ही सेवा सुरु केली जाणार आहे.