तुम्हालाही दुधाचा चहा आवडतो का? वेळीच सावध व्हा. दुधाचा चहा सकाळी रिकाम्या पोटी पीत असाल, तर आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. दुधाशिवायचा चहा प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते, धमनी रोग, पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो, असे 'आयसीएमआर'ने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
वैद्यकीय शास्त्रानुसार चहामध्ये कॅफिनशिवाय थिओफिलिन देखील असते. जास्त चहा पिल्याने शरीरात निर्जलीकरण होते, ज्यामुळे गंभीर बद्धकोष्ठता निर्माण होऊ शकते. जर तुम्ही सतत चिंतेने त्रस्त असाल, तर वारंवार चहा पिणे बंद करा. चहा घेतल्याने त्रास वाढतो. चहामुळे निद्रानाश होऊ शकतोे. निद्रानाशाच्या लक्षणांनी त्रस्त असताना दुधाचा चहा पिणे टाळा. जास्त दूध असलेल्या चहामुळे डीहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे डोकेदुखी वाढते. म्हणून दूध आणि साखर घातलेला चहा जास्त पिणे टाळावे. चहामध्ये थिओफिलिन देखील असते. चहाचे जास्त सेवन केल्याने शरीर कोरडे होऊ शकते.
चहात दूध घालण्याची सुरुवात चीनमधे सतराव्या शतकाच्या सुमारास झाली. त्या काळात चहाचे कप एवढे नाजूक असत, की गरम चहामुळे ते तडकून फुटत. म्हणून आधी कपात दूध घालून त्यावर चहाचे द्रावण टाकले जायचे. हीच पध्दत ब्रिटिश लोकांनी पुढे चालू ठेवली. त्यांच्याकडून आपण ती उचलली. चहामध्ये उत्तम अँटी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आपल्या हृदयाचे संरक्षण होऊ शकते. परंतु, आहारतज्ज्ञांच्या मते, दुधामुळे चहाचे हे फायदे फार मोठ्या प्रमाणात कमी होतात.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय पोषण संस्थेने केलेल्या संशोधनात म्हटले आहे की, कॉफी आणि चहाचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढतो. जेवणाबरोबर किंवा नंतर लगेच चहा घेणे टाळावे. जेवणापूर्वी आणि नंतर एक तास चहा घेऊ नये. रिकाम्या पोटी दुधाचा चहा घेणे धोकादायक आहे. जास्त दुधाचा चहा प्यायल्याने पोट फुगते. चहामध्ये कॅफिन असते, जे पोटासाठी चांगले नाही. त्यात दूध घातल्यास आम्लता वाढते.
अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते, यात शंकाच नाही. चहा प्यायल्यानंतरच बरेच जणांना ऊर्जा जाणवते. आल्याचा चहा वेदना कमी करण्यात प्रभावी ठरतो. चहाला आपण 'मूड लिफ्टर' असे देखील म्हणू शकतो. पण केवळ दुधाचा चहा पिल्याने मधुमेहाचे नियंत्रण बिघडते. दुधाचा चहा आरोग्यासाठी घातक आहे. त्याऐवजी काळा चहा घेणे फायदेशीर आहे.
– डॉ. स्मिता पाटील आहारतज्ज्ञ, सांगली