Shivaji University Vice Chancellor : डॉ. रजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

Shivaji University Vice Chancellor : डॉ. रजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
Published on
Updated on

मुंबई : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रजनीश कामत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी (दि. २१) त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. उच्च शिक्षण क्षेत्रातील दीर्घ अनुभव, संशोधन क्षेत्रातील भरीव कामगिरी आणि प्रशासनातील नेतृत्व यामुळे डॉ. रजनीश कामत यांच्या नियुक्तीकडे राज्यातील शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले होते.

शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ ७ ऑक्टोबर २०२५ रोजी संपल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. नव्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी भारतीय विद्यापीठाच्या गणित विभागाचे माजी प्रमुख डॉ. पी. कंदास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. समितीवर विद्यापीठ अनुदान आयोगाचे प्रतिनिधी म्हणून प्रा. एन. सी. गौतम, भारतीय तंत्रज्ञान संस्था इंदोरचे संचालक डॉ. सुहास जोशी तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांचा समावेश होता. या समितीने शिफारस केलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. रजनीश कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

डॉ. रजनीश कामत यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत, यापैकी जी तारीख अगोदर येईल त्या कालावधीपर्यंत राहणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्राला नवे नेतृत्व मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमांमध्ये नावीन्य, कौशल्याधारित शिक्षण, उद्योग-विद्यापीठ सहकार्य आणि संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीने त्यांच्या कार्यकाळाकडे महत्त्वाच्या नजरेने पाहिले जात आहे.

डॉ. रजनीश कामत यांनी शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात एम.एस्सी. पदवी घेतली असून गोवा विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली आहे. ते उच्च शिक्षण क्षेत्रातील अनुभवी आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मानले जातात. त्यांना २८ वर्षांहून अधिक अध्यापन, संशोधन आणि प्रशासनाचा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी शिवाजी विद्यापीठात विज्ञान व तंत्रज्ञान संकुलाचे अधिष्ठाता तसेच संगणक विज्ञान विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सायकल/सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध शैक्षणिक आणि संशोधन उपक्रम राबविण्यात आले होते.

तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन विद्यापीठ येथे अतिरिक्त कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचाही अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे आहे. विविध विद्यापीठांमधील प्रशासनाचा अनुभव, शैक्षणिक धोरणांवरील पकड आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यास यामुळे त्यांची ओळख बहुआयामी प्रशासक म्हणून निर्माण झाली आहे.

संशोधन क्षेत्रातही डॉ. रजनीश कामत यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या नावावर २११ संशोधनपत्रिका आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाल्या असून १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच २०० हून अधिक संशोधन निबंध, अनेक पेटंट्स आणि विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांची अंमलबजावणी त्यांनी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स आणि सायबर-फिजिकल सिस्टीम्स या क्षेत्रांतील त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते. तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारे शैक्षणिक प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news