

मुंबई : रक्षाबंधनाच्या सजावटीच्या साहित्यामुळे सात महिन्यांच्या चिमुकल्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली. कृष्णाच्या मोरपंख असलेल्या छोट्या धातूच्या लॉकेटपैकी एक लॉकेट मुलाने गिळल्याने कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली. सुदैवाने पालिकेच्या कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने एंडोस्कोपी करून ते सुखरूप बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, सात महिन्यांचा आरोहित गुप्ता हा आई-वडील बाहेर गेले असल्याने आत्याकडे होता. घरात राख्या तयार करण्याचे काम सुरू असल्याने मणी, धागे आणि सजावटीचे छोटे धातूचे तुकडे विखुरलेले होते. याचदरम्यान चिमुकल्याने कृष्णाची प्रतिमा असलेले दोन छोटे लॉकेट तोंडात टाकले. त्यापैकी एक लॉकेट लगेच बाहेर काढण्यात आले; मात्र दुसरे सापडत नसल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
त्यानंतर मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक्स-रेमध्ये लॉकेट अन्ननलिकेच्या वरच्या भागात अडकले असल्याचे स्पष्ट झाले. ईएनटी तज्ज्ञ डॉ. दिलेश मोगरा, त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच भूलतज्ज्ञ डॉ. पूनम यांच्या मदतीने जनरल ॲनेस्थेशियाखाली एंडोस्कोपी करण्यात आली. तपासणीदरम्यान मोरपंख असलेले कृष्णाचे लॉकेट अडकलेले दिसून आले. डॉक्टरांनी अत्यंत काळजीपूर्वक ते बाहेर काढले. संपूर्ण प्रक्रिया यशस्वी ठरली असून मुलाची प्रकृती स्थिर आहे.
“लहान मुले अत्यंत कुतूहलपूर्ण असल्याने मोठ्यांच्या दुर्लक्षामुळे अपघात घडू शकतात. त्यामुळे पालकांनी व कुटुंबीयांनी लहान वस्तू, सजावटीचे साहित्य किंवा धातूचे तुकडे मुलांपासून लांब ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकरणात वेळेत निदान आणि एंडोस्कोपिक उपचार झाल्यामुळे मोठा धोका टळला,” असे शताब्दी कांदिवली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांनी सांगितले.