

मुंबई : मी रात्रीच्या जेवणासाठी घरी येत आहे, असा आपल्या आईला फोन करून काही मिनिटांतच सर जे जे हॉस्पीटलच्या एका 32 वर्षीय डॉक्टरने शिवरी-न्हावा सी लिंक अटल सेतूवरून सोमवारी (दि.7) रात्री समुद्रात उडी घेतली. दरम्यान, सदर डॉक्टरचा शोध सुरू असल्याचे मंगळवारी (दि.8) नवी मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.
नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये राहणार्या या डॉक्टरचे नाव ओमकार कवितके असे असून एका वाहनचालकाला सोमवारी रात्री तो अखेरचा दिसला होता. यानंतर या वाहनचालकाने पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली.
डॉ. कवितके यांनी अटल सेतूवर आपली कार थांबवून पुलाचे रेलींग ओलांडले, असेही यासंदर्भात तपास करणार्या पोलिसांकडून सांगण्यात आले.जेव्हा नवी मुंबईच्या उलवा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना तेथे कार व आतमध्ये एक आयफोन आढळून आला. यानंतर फोनवरून काही नंबरवर कॉल केल्यानंतर सदर कार डॉ. कवितके यांची असून ते गेल्या 6 वर्षांपासून मुंबईच्या सर जे जे हॉस्पीटलमध्ये काम करत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी डॉ. कवितके यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देत शोधमोहिम सुरू केली.
जेव्हा आम्ही फोन कॉलचा तपशिल तपासला तेव्हा डॉक्टरांनी सोमवारी रात्री 9.11 वा. शेवटचा कॉल आपल्या आईला करत आपण थोड्याच वेळात जेवणासाठी येत आहोत असे सांगितले, अशी माहिती उलवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक अर्जुन राजने यांनी दिली.डॉ.कवितके यांनी अटल सेतूवरुन का उडी घेतली याचा तपास करण्यासाठी पोलीस त्यांचे कुटुंबिय, सहकारी तसेच मित्रमंडळींशी चर्चा करत आहेत.