

राजेंद्र पाटील
नवी मुंबई : महाराष्ट्राच्या ७५ टक्के भागात जाहीर झालेला दुष्काळ, तीव्र पाणीटंचाई आणि इराण युद्धाने सुरू झालेली सततची इंधन दरवाढ अशा तिहेरी तडाख्यात यंदाची दिवाळी सापडली आणि फराळाचा घमघमाट तब्बल ३० टक्क्यांनी महागला.
सर्वच वस्तू महागल्याने यंदा फराळ करताना हात जरा आखडताच घ्यावा लागणार असून, दिवाळसण म्हणून फराळाची परंपरा जपताना प्रत्येकाच्याच खिशाला मोठी कसरत करावी लागेल. करंजी, शंकरपाळी, अनारसे, लाडूंचा खर्च किलोमागे १०० रुपयांनी वाढला आहे. खाद्यतेलाच्या दरांनी तर ३० टक्क्यांची उसळी घेतली आहे. परिणामी, फराळ तयार करण्यासाठी येणारा खर्च किलोमागे सुमारे ३० टक्क्यांनी वाढला. दरवर्षी वस्तूंचे दर एकसारखे नसतात. त्यात वार्षिक वाढ क्रमप्राप्त असते. मात्र, यंदा बहुतांश वस्तूंच्या दरवाढीचे रॉकेट महागाई, अनियमित हवामानामुळे जरा जास्तच सुसाट उडालेले दिसते.
दै. ‘पुढारी’ने ‘एपीएमसी’ बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी संवाद साधून गेल्या काही वर्षांतील तुलनात्मक दरवाढीचा अंदाज घेतला. त्यानुसार २०१९ मध्ये रवा लाडू तयार करण्यासाठी किलोमागे ३०० ते ४०० रुपये खर्च होता, तो आज ६५० रुपयांवर गेला आहे. चकल्यांचा खर्चही किलोला ६०० रुपये झाला आहे. २०२१ मध्ये एक किलो बेसन लाडूसाठी ५५० रुपये खर्च येत असे, तिथे आज ७०० ते ९०० रुपयेदेखील कमी पडत आहेत. २०२१ मध्ये ४०० रुपयांत किलोभर खमंग चिवडा करणे शक्य होते, तिथे आता ५५० ते ६०० रुपये खर्च केल्यानंतरच एक किलो चिवडा होत आहे.
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सर्वच जिन्नस दुपटीने महागले आहेत. मात्र, दिवाळी परंपरा, संस्कृती जपणारा सण असल्याने महागाई वाढली, तरी गृहिणींना आर्थिक खर्चाचे गणित साधून मोजकेच पदार्थ यंदा करावे लागतील.
सोनाली योगेश पाटील
घरगुती फराळनिर्मितीसाठी होणारा खर्च (रुपये प्रतिकिलो)
पदार्थ २०१९ २०२१ २०२६
रवा लाडू ३०० ते ४०० ५०० ६५०
चकली ३०० ते ४०० ५०० ६००
शंकरपाळी ४०० ५०० ६००
चिवडा २५० ते ३०० ४०० ५५० ते ६००
बेसन लाडू ४५० ५५० ७०० ते ९००
करंजी ४०० ५०० ६०० ते ७००