

मुंबई : राजेश सावंत
'अरे बाळू.. अरे गण्या.. चला माती आणायला.. यंदा दिवाळीला गड किल्ले बनवायचे आहेत ना? अशी साद आता मुंबईतील गल्ल्यांमध्ये दिवाळीला फारशी ऐकू येत नाही. गल्लोगल्लीत बच्चे कंपनीकडून बनवण्यात येणारे मातीचे गडकिल्ले मोबाईलच्या युगात पूर्णपणे हरवून गेले आहेत
दिवाळीला मातीचे गड-किल्ले बनवण्याची मजा काही औरच होती. रात्रभर जागरण करून, गल्लीतील मुले वेगवेगळ्या आकाराचे मातीचे गड-किल्ले साकारत होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक किल्ल्यांसह अरबी समुद्रात दिमाखात उभे असलेले सिंधुदुर्ग, जंजिरासारखे पाण्यातील किल्लेही या बच्चे कंपनीकडून साकारण्यात येत होते. गेल्या काही वर्षांत दिवाळीत गड-किल्ले साकारण्यासाठी मुलांमध्ये जो उत्साह होता तो आता दिसून येत नाही.
बच्चे कंपनीमध्ये उत्साह नसल्यामुळे आता अगदी घरातील मोठी माणसेही किल्ले बनवण्यासाठी बाहेर पडतात. या बदलाला मुलांचे मोबाईलचे आकर्षण जबाबदार आहे. तासन्तास मुले मोबाईलवर अनेक व्हिडिओ, रील्स बघत असल्यामुळे दिवाळीत साकारण्यात येणाऱ्या गडकिल्ल्यांचे महत्त्व आता लोप पावत चालले आहे. आजही मुंबईतील मराठी लोकवस्ती असलेल्या परळ, लालबाग, शिवडी, नायगाव, काळाचौकी, माझगाव, दादर, गिरगाव, ताडदेव येथे ठिकठिकाणी किल्ले बनवलेले दिसून येतात. विविध राजकीय पक्षांकडून स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते. पण आता ती क्रेझ दिसून येत नाही. किल्ले बनवणे हा दिवाळीच्या सुट्टीत एक मनोरंजक उपक्रम होता. जो मुलांमध्ये इतिहास, शौर्य आणि सकारात्मकतेची भावना रुजवण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून राबवला जात आहे.
माती, गेरू, शेणाने लेप देण्यात येणाऱ्या किल्ल्यांची जागा आता पीओपीने घेतली आहे. एवढेच काय, तर आता बाजारात अगदी तयार किल्लेही मिळतात. त्यामुळे मातीचे किल्ले बनवण्याची आवड आता कोणाला उरलेलीच नाही. मुंबईतील काही मराठी लोकवस्तीमध्ये ही प्रथा आजही जोपासली जात आहे. पण पू-र्वीसारखा उत्साह मात्र कुठेच दिसून येत नाही. मराठी लोकवस्ती असलेल्या भागांत आजही राजकीय पक्षांकडून
किल्ल्यांची स्पर्धा आयोजित करण्यात येते. यात परळ, लालबाग, गिरगावचा समावेश आहे. पण येथे बनवणारे किल्ले आता मातीचे नसून पीओपीचे दिसून येतात. हे किल्ले बघण्यासाठी पूर्वीसारखी गर्दी होत नसली तरी, काहीजण आवर्जून येतात. हे किल्ले बनवण्यासाठी आता मुलांसोबत घरातील मोठी माणसेही सहभागी होतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासासह महाराजांच्या शौर्याची आठवण डोळ्यांसमोर उभी राहते.