

मुंबई : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेला पराभव, त्यामुळे इराणशी असलेले युद्ध थांबण्याची निर्माण झालेली चिन्हे, कच्च्या तेलाच्या भावात झालेली घट यामुळे गुरुवार (दि. ५) च्या सत्रात शेअर बाजाराने जोरदार दिवाळी साजरी केली. सेन्सेक्स २ हजार ८ आणि निफ्टी निर्देशांक ५७६ अंकांनी वधारला. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशीच गुंतवणूकदारांवर तब्बल आठ लाख कोटी रुपयांचा धनवर्षाव झाला. त्याचवेळी सराफ बाजारातही मोठी वाढ दिसून आली. सोने दरात २,३२८ रुपयांनी वाढ होऊन सोने प्रतिदहा ग्रॅम १.४४ लाखावर पोहोचले, तर चांदी १,७४९ रुपयांनी वाढून प्रतिकिलो १.८८ लाखावर गेली.
मुंबई शेअर बाजारात (बीएसई) गुरुवारच्या सत्राची सुरुवात सेन्सेक्सच्या १,६०९ अंकांच्या वाढीने झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक ४१८ अंकांनी वाढला होता. दिवसभरात सेन्सेक्स २,१६० अंकांनी वाढून ७९,४७० अंकांवर गेला, तर निफ्टी निर्देशांक ६१९ अंकांनी वाढून २४,५७९ अंकांवर झेपावला होता. बाजार बंद होताना सेन्सेक्स २.५९ टक्क्यांच्या वाढीसह ७९,३१० अंकांवर स्थिरावला, तर निफ्टी निर्देशांक २.४० टक्क्यांच्या वाढीसह २४,५३६ अंकांवर विसावला. मीडिया आणि केमिकल निर्देशांक वगळता सर्व निर्देशांकांत वाढ झाली. ऑटो निर्देशांकाने चार टक्क्यांनी उसळी घेतली असून, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस ३.९ टक्के, बँक निर्देशांक ३.३ टक्क्यांनी वधारला. निफ्टी मिड कॅप निर्देशांकात १.८ टक्क्याची वाढ नोंदवण्यात आली.
बुधवारी परदेशी गुंतवणूकदारांनी ७,२८४ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स खरेदी केले असून, २८ ऑक्टोबर २०२५ नंतरची ही त्यांची एका दिवसातील सर्वाधिक खरेदी ठरली आहे. सलग चौथ्या सत्रात विदेशी गुंतवणूक संस्थांनी (एफआयआय) निव्वळ खरेदी केली आहे.
कच्च्या तेलाच्या भावात घसरण
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचे सकारात्मक पडसाद आंतरराष्ट्रीय तेल बाजारात उमटले. ब्रेंट क्रूड ऑईलचे भाव ०.४९ टक्क्याने घटून ९४.०९ डॉलर्सवर आले होते, ते ९३.४० डॉलर्सपर्यंत आणखी खाली आले. होर्मुझ सामुद्रधुनीत काही जहाजांवर हल्ले झाल्याचे वृत्त इराणने दिल्यानंतर ब्रेंट क्रूड ऑईलचे भाव ९६ डाॅलर्स आणि यूएस डब्ल्यूटीआयचे भाव ८८ डॉलर्स प्रतिबॅरलवर आले होते. मात्र, गत सप्ताहाच्या सुरुवातीस ब्रेंट क्रूडचे भाव ११५ डॉलर्स प्रतिबॅरल होते. त्यातुलनेत दर बरेच खाली आले आहेत.
दोन दिवसांत सोन्यात ५,३०० तर चांदीत ९ हजारांनी वाढ
कोल्हापूर : अमेरिकेतील राजकीय घडामोडी आणि जागतिक बाजारातील उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला स्थानिक सराफ बाजारात मौल्यवान धातूंच्या भावात अचानक मोठी उसळी पाहायला मिळाली. मंगळवारच्या (दि. ३) तुलनेत अवघ्या दोन दिवसांत २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅम तब्बल ५ हजार ३०० रुपयांची वाढ झाली असून, सोने १ लाख ४२ हजार ५०० रुपयांवरून थेट १ लाख ४७ हजार ८०० रुपयांवर पोहोचले आहे. दुसऱ्या बाजूला चांदीच्या भावातही मोठी मुसंडी नोंदवली गेली. मंगळवारी प्रतिकिलो १ लाख ८४ हजार ५०० रुपयांवर असणारी चांदी दोन दिवसांत तब्बल ९ हजार रुपयांनी महागली असून, ती १ लाख ९३ हजार ५०० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.