

कोपरखैरणे: महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आलेल्या ड्रग्ज माफिया शांताबाई करंडेकर (वय 50) हिच्या दिघा ईश्वरनगरमधील दुमजली घर बुधवारी सिडकोने कारवाई करीत जमीनदोस्त केले.
शांताबाई हिच्यावर अमली पदार्थ विक्रीबाबतचे तीन आणि मारामारीचे चार असे सात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर मोक्का अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. नशामुक्त नवी मुंबई मोहीमेचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आरोपी शांताबाई हिने दिघा ईश्वरनगरमध्ये सिडकोच्या भूखंडावर दुमजली अनधिकृत बांधकाम केले होते. त्याठिकाणी अमलीपदार्थ विक्रीचा व्यवसाय करीत होती. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आणि सिडकोने संयुक्तपणे बुधवारी दुपारच्या सुमारास या बांधकामावर कारवाई केली. यात अनधिकृत बांधकामासह अमलीपदार्थांचा हा अड्डाच उद्ध्वस्त करण्यात आला.
नवी मुंबईतील अशी ही पहिलीच कारवाई आहे. रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे आणि सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे प्रमुख विशाल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यकांत राठोड यांच्या देखरेखीत ही कारवाई पार पडली.
तस्करांविरुद्ध कठोर कारवाई
या कारवाईतून नवी मुंबइ पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्पष्ट संदेश दिला की, तरुण पिढीला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या तस्करांविरुद्ध अशाच कठोर कारवाया सुरू राहतील. तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि दक्षता विभागाचे प्रमुख सुरेश मेंगडे यांनी सिडकोच्या जागेवर बेकायदा कृत्य आणि अनधिकृत बांधकामांना कोणताही थारा दिला जाणार नाही, हे अधोरेखित केले.