

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील दिघा परिसरातील इलठण पाडा येथील ब्रिटिशकालीन धरण हे मृत्यूचा सापळा ठरत असून वर्षभरात या धरणात बुडून तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
निसर्गरम्य परिसर, वर्षभर उपलब्ध असलेले पाणी व पर्यटनासाठी आकर्षक ठिकाण म्हणून ओळख असलेल्या या धारणाकडे सुरक्षेच्या दृष्टीने मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
दिघा येथील इलठण पाडा येथील डोंगररांगांच्या कुशीत वसलेले हे धरण पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरते. हिरवागार निसर्ग, धबधब्यासारखा वाहणारा पाण्याचा प्रवाह आणि शांत वातावरण असल्याने येथे वर्षभर पर्यटक, युवक व निसर्गप्रेमी भेट देत असतात. विशेषतः पावसाळ्यात आणि सुट्टीच्या दिवशी येथे गर्दी वाढते.
मात्र, या तलावातील पाण्याची खोली, घसरडा किनारा व अचानक बदलणारा पाण्याचा प्रवाह याबाबत अनेकांना माहिती नसल्याने दुर्घटना घडत आहेत. या परिसरात धरण परिसरात पोहण्यास बंदी असल्याचे कोणतेही फलक दिसून येत नाहीत.
तसेच लोखंडी संरक्षक जाळी, सुरक्षा कठडे, बचाव साहित्य, लाईफ जॅकेट किंवा प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची व्यवस्था नसल्यामुळे दुर्घटना घडल्यास तातडीने मदत मिळणे कठीण होते. अनेक युवक सेल्फीसाठी किंवा पोहण्यासाठी धोकादायक भागात जातात. काही वेळा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने किंवा घसरून पाण्यात पडल्याने त्यांचा जीव जात असल्याचे स्थानिक राहिवासी सागर सोनकांबळे यांनी सांगितले.
नुकतेच या धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेल्या या तरुणाचा पाण्यात तोल गेल्यानंतर तो खोल भागात गेला आणि बाहेर येऊ शकला नाही. या घटनेनंतर पुन्हा एकदा धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.