

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) अधिकृत ‘डीआरपी अंतिम परिशिष्ट - 2’ मधील आकडेवारी प्रथमच हाती आली असून, त्यानुसार एकूण 3,518 घरांपैकी फक्त 1,178 घरे (33%) इन-सिटू म्हणजेच धारावीतच पुनर्वसनासाठी पात्र ठरली आहेत.
शासकीय भाषेत यात फक्त 75 घरे म्हणजेच अंदाजे 2% घरे अपात्र घोषित करण्यात आली असली तरी एकूण 3,518 घरांपैकी 2,099 घरे (57%) गृहनिर्माण लाभांसाठी पात्र ठरली आहेत. याचा अर्थ या कथित पात्र रहिवाशांना धारावीत घर मिळणार नाही. गृहनिर्माण लाभ मात्र मिळतील. याशिवाय 1,078 घरे (30.6%) प्रलंबित असून त्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत किंवा विविध शासकीय संस्थांकडून पडताळणी प्रक्रियेत आहेत. “ही घरे अपात्र नाहीत. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा पुनर्विचार केला जाईल,” असे
डीआरपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अंतिम परिशिष्ट - प्रसिद्ध झाल्यानंतरही ही प्रक्रिया संपत नाही. “तक्रारींच्या निवारणासाठी रहिवासी प्रथम अपील अधिकारी यांच्याकडे जाऊ शकतात. समाधान न झाल्यास ते तक्रार निवारण समितीकडे जाऊ शकतात. ही समिती सर्वेक्षण प्रक्रियेत सहभागी नसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
डीआरपी अंतिम परिशिष्ट
9 डिसेंबर 2025 पर्यंतची आकडेवारी
एकूण घरसंख्या : 3,518
थेट धारावीत इन-सिटू पुनर्वसन पात्र : 1,178 (33%)
फक्त गृहनिर्माण लाभांसाठी पात्र : 2,009 (57%)
प्रलंबित/कागदपत्रांची पडताळणी सुरू : 1,078 (30.6%)
सार्वजनिक सुविधा/उपयोगी संरचना : 330 (9.38%)
जाहीर अपात्र : 75 घरे (सुमारे 2%)