मुंबई : कुर्ल्यातील नागरिकांचा विरोध झुगारून मदर डेअरीची 21 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात येणार असल्याने येथील नागरिकांनी गुरुवारी थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी चाल करून जाण्याचे ठरवले. मात्र, पालिसांनी परवानगी न दिल्याने त्यांनी आझाद मैदानात आंदोलन करीत धारावी पुनर्वसनासाठी मदर डेअरीची जागा देणार नाही असा निर्धार केला.
लोकचळवळ मुंबई या झेंड्याखाली आझाद मैदानात आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्यात आले. कुर्ला येथून पदयात्रेद्वारे जाणार होतो, पण;पोलिसांनी परवानगी नाकारली म्हणून याठिकाणी आंदोलन करावे लागले असल्याचे आंदोलक संदीप एतम यांनी सांगितले. लोकचळवळी प्रतिनिधी किरण पैलवान व विद्या इंगवले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी महायुती सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला (पूर्व) मदर डेअरीची शासकीय जागा वापरण्याचा 10 जून 2024 चा निर्णय त्वरित रद्द करावा, मदर डेअरी शासकीय वसाहतीतील कर्मचार्यांच्या बेदखलीस स्थगिती द्यावी, कुर्ला (पूर्व) परिसराच्या शहररचनेबाबत नव्याने सर्वेक्षण करून डीपीमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात आदी मागण्या आहेत. यापूर्वी चार वेळा स्थानिक आमदारांना आठ वेळा मुख्यमंत्री कार्यालयास भेटीची पत्रे पाठवली. दखल न घेतल्याने याठिकाणी आंदोलन करावे लागले, असे आंदोलकांनी सांगितले.