

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि त्यांच्या काही साथीदारांना अटक कऱण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण चांगलेच उचलून धरले आहे. मंत्री मुंडे यांनी मविआ सरकारमध्ये असताना कृषी भ्रष्टाचार कसा केला यासंबंधी पुरावे देखील दमानिया यांनी वेळोवेळी उघड केले आहेत. आज (दि.२३) त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म एक्सवर पोस्ट करत संताेष देशमुख हत्या प्रकरणी मुंडे यांना सवाल केले आहेत.
अंजली दमानिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्सवरून आज (दि.२३) एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, "धनंजय मुंडे माझे दैवत, वाल्मिक कराड माझे नेते', असे म्हणणारे बाळाजी तांदळे यांना पत्र देऊन त्यांना बरोबर घेऊन, त्यांच्याच जवळच्या मित्रांचा, जे खुनाचे आरोपी आहेत, ह्यांना घेऊन पोलिस शोध करू शकतात का ? जे पकडले गेले, ते “मुद्दाम पकडवून, बळी दिले गेले” ह्यात शंका आहे का"?, म्हणूनच कराड फरार राहू शकले आणि आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी दाखवले गेले की, पोलिसांचा तपास चालू आहे. जर प्रकरण लावून धरलं नसतं तर कराडला देखील अटक झाली नसती.
बालाजी तांदळे, जो जमिनीचा बंदोबस्त करतो, प्रत्येक स्थळी उपस्थित असतो, तो शोधेल आरोपींना ? ह्याची नुसती चौकशी करून त्याला सोडून दिले ? ह्याला जर थर्ड डिग्री वापरून चौकशी केली, तर कळेल सगळं कुणाच्या सांगण्यावरून होत होते. पी आय गोसावी आणि भागवत शेलार यांचे सीडीआर जाहीर करा. पहिल्या दोन आरोपींची TIP कुणाकडून आली ? देवेंद्र फडणवीस आता तरी काही बोलणार का अजून त्यांना गरज वाटत नाही?, असा सवाल देखील दमानिया यांनी एक्स पोस्टमधून सरकारला केला आहे.