मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचे काही व्हिडीओ बाहेर आले असून, त्याची सत्यता पडताळणे आवश्यक आहे. आता जे काही व्हिडीओ बाहेर आले आहेत ते गंभीर आहेत. ते व्हिडिओ खरे असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईलच, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने नवा वादंग निर्माण झाला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, जे व्हिडीओ बाहेर आले त्यांची सत्यता पडताळणे आवश्यक आहे. यासंदर्भात मंत्री झिरवळ यांनी आपल्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असून व्हायरल झालेला व्हिडीओ हा तीन-चार व्हिडिओ एकत्र जोडून चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याचे सांगितले. तसेच त्याची चौकशीची व्हावी असेही म्हणाले. त्यावर, त्यांनी यासंदर्भात तक्रार दाखल करावी, असा सल्ला आपण त्यांना दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल, असे सांगतानाच सध्या जी परिस्थिती समोर आली आहे. त्यानंतर या व्हिडीओची सत्यता काय आहे, ती पडताळून पाहिली जाईल. त्यानंतर, त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू. मात्र, आता जे काही व्हिडिओ समोर आले आहेत ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याची सत्यता पडताळणे अत्यंत गरजेचे आहे. आणि ते जर सत्य असतील तर त्याच्यावर योग्य ते कारवाई होईलच, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.