

मुंबई : मतदार याद्यांच्या शुद्धीकरणावरून गळा काढणाऱ्या विरोधकांचा दांभिकपणा आणि दुटप्पी चेहरा आता चव्हाट्यावर आल्याची बोचरी टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मधील एक स्फोटक व्हिडिओ ‘एक्स’वरून शेअर केला आहे. या व्हिडिओच्या आधारे त्यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे.
आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल ज्या फेरतपासणीची एकेकाळी स्वतःच आक्रमकपणे वकिली करत होते, त्याच प्रक्रियेला आता विरोध करून विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याचा घणाघाती आरोप करत फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.
आपल्या 'एक्स' अकाउंटवरून हा जुना व्हिडिओ समोर आणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केजरीवाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांची ती जुनी मागणी आणि आजचा त्यांचा ढोंगी पवित्रा यातील तफावत उघडी पाडताना फडणवीस म्हणाले, ‘कपिल सिब्बल यांच्यानंतर आता मतदार यादीच्या सखोल पडताळणीची मागणी करणाऱ्या केजरीवाल यांच्या जुन्या व्हिडिओने स्वतः त्यांना आणि राहुल गांधींना पूर्णपणे उघडे पाडले आहे!’
जानेवारी २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांनीच पत्रकार परिषदा घेऊन मतदार याद्यांमध्ये लाखो बोगस आणि दुबार नोंदी असल्याचा प्रचंड गदारोळ केला होता. तब्बल पावणेचार ते चार लाख लोकांकडे सुमारे ११.५ लाख बोगस ओळखपत्रे असल्याचा दावा ठोकत, एकाच व्यक्तीकडे दोन ते चार कार्डे असल्याचा दावा केजरीवाल यांनीच केला होता, याची आठवण फडणवीस यांनी करून दिली.
केवळ दिल्लीच नव्हे, तर हरियाणा आणि उत्तर प्रदेशसारख्या लगतच्या राज्यांच्या मतदार याद्यांमधील समान नावांवर बोट ठेवत निवडणुकांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा कांगावा करणाऱ्या 'आप'ने त्यावेळी संशयित दुबार नोंदींच्या सीडी आणि डेटा निवडणूक आयोगाच्या तोंडावर भिरकावला होता. आज मात्र जेव्हा निवडणूक आयोग खरोखरच ही घाण साफ करण्यासाठी 'एसआयआर' मोहीम राबवत आहे, तेव्हा याच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
सध्या काँग्रेस आणि 'आप'सह संपूर्ण विरोधी टोळीने या कायदेशीर प्रक्रियेला थेट 'मतचोरी' असे नाव देऊन थयथयाट सुरू केला आहे. मोहीम रद्द करा, जुनीच संशयास्पद यादी कायम ठेवा, अशा मागण्या करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि अटकेची भाषा वापरणाऱ्या विरोधकांना फडणवीस यांनी जोरदार फटकारले आहे. जेव्हा स्वतःवर शेकण्याची वेळ येते, तेव्हा सुधारणांनाच विरोध करायचा हा विरोधकांचा ढोंगीपणा उघड झाला आहे.
यापूर्वीही काँग्रेसवर असाच जोरदार हल्ला चढवताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व माजी केंद्रीय कायदामंत्री कपिल सिब्बल यांच्या संसदेतील जुन्या भाषणाचा दाखला दिला होता. सिब्बल यांनी कायदामंत्री असताना सभागृहात मांडलेल्या भूमिकेचा हवाला देत फडणवीस यांनी काँग्रेसच्या 'बनावट मतचोरीच्या नौटंकी'ची लक्तरे वेशीवर टांगली होती. "नेहमी भ्रष्ट, अतिरेकी आणि देशविरोधी तत्त्वांची वकिली करणाऱ्या कपिल सिब्बल यांची विचारसरणी मला मुळीच मान्य नाही; पण संसदेतील जुन्या भाषणाद्वारे त्यांनी काँग्रेसच्या मतचोरीच्या थोतांडाचा बुरखा ज्या पद्धतीने टराटरा फाडला, त्यामुळे ते पहिल्यांदाच मला आवडले आहेत," असा थेट आणि बोचरा टोला लगावत फडणवीस यांनी विरोधकांची पुरती कोंडी केली आहे.