मुंबई; पुढारी वृत्तसेवा : घाटकोपर-चिरागनगर येथील अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे काम लवकरच मार्गी लावले जाईल. यासाठी नव्याने आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. राम कदम यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
चिरागनगर येथे अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय फडणवीस सरकारमध्ये घेतला होता. नंतर महाविकास आघाडी सरकारने स्मारकाची जागा बदलली. त्यामुळे परवानगी मिळण्यास अडचणी येत असल्याचा मुद्दा कदम यांनी मांडला. महाविकास आघाडी सरकारने केलेली ही चूक दुरुस्त करावी, असे ते म्हणाले.
घाटकोपरमधील चिरागनगर येथे अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी त्यांच्या घराची जागा निश्चित केली आहे. येथील झोपडपट्टीमुळे सुरक्षेचा प्रश्न येत होता. त्यामुळे एसआरए आणि म्हाडा यांच्या माध्यमातून झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी दिला आहे. स्मारकासाठी आराखडा तयार केला होता. यामध्ये साठे यांच्या घराचा भाग आलेला नाही. तसेच बाजूला नौदलाची जागा असल्याने स्मारकाच्या उंचीला अडथळा निर्माण होतो आहे. राज्य शासनकडून ही चूक सुधारली जाईल. मंत्रिमंडळ बैठकीत यापूर्वीच त्यावर चर्चा झाल्याचेे फडणवीस म्हणाले.
अण्णा भाऊ साठे चिरागनगर येथे राहत होते. तेथेच स्मारक उभारले जात आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला त्याच परिसरात घर दिले जाईल. राज्य सरकार त्यासाठी निधी देईल, असेही फडणवीस म्हणाले.