

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदारही आमचेच आहेत. त्यांना फोडून काय करणार? मित्रपक्षांचे आमदार फोडण्याचे राजकारण भाजपा कधीही करत नाही, त्यामुळे कोणाच्या म्हणण्याने काही होत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपाच्या गळाला लागल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला. या वक्तव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच प्रत्युत्तर देत त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले.
ते म्हणाले, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भाजपात घेऊन काय करायचे? ते आमचेच आहेत. आता उद्या असे कोणीही म्हणू शकेल की, आदित्य ठाकरे यांचे जे 20 आमदार आहेत ते देखील भाजपच्या गळाला लागले आहेत. असे कोणाच्या म्हणण्याने थोडेच काही होते? शिंदे शिवसेना ही आमचा मित्र पक्ष आहे. तिच खरी शिवसेना आहे. मित्र पक्षाचे आमदार आमच्याकडे घेण्याचे अशा प्रकारचे राजकारण आम्ही कधीही करत नाही. उलट शिंदेंची शिवसेना आणखी मजबूत झाली पाहिजे, यासाठी आम्ही शिवसेनेच्या पाठिशी आहोत. भविष्यात भाजपा, शिवसेना आणि आमची महायुती आणखी मजबूत होताना दिसेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर हे भारताच्या स्वातंत्र्याचा मंत्र आहे, हा राष्ट्रवादाचा मंत्र आहे. ज्या वंदे मातरमला गाताना भारताच्या कित्येक स्वतंत्रता सेनानी आणि क्रांतिकारक फाशीवर गेले, हा तो महामंत्र आहे. आदित्य ठाकरे यांनी वंदे मातरमच्या घोषणेवर बंदी घालण्यात आली आहे, आता फक्त भाजपचेच नारे द्यायचे का? देशाचा जयजयकार चालणार नाही का? अशी टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पलटवार केला.