आधी शरद पवारांसोबत बैठक, नंतरच पहाटेचा शपथविधी!

आधी शरद पवारांसोबत बैठक, नंतरच पहाटेचा शपथविधी!
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय एका रात्रीत झाला नव्हता. खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठकीत चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतरच पहाटेचा शपथविधी झाला, असा गौप्यस्फोट विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सकाळी उठलो आणि दोघे अचानक शपथविधीला गेलो, असे काही घडले नव्हते. शरद पवार यांनी आमच्याशी डबल गेम केला; तर उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप फडणवीस यांनी बुधवारी केला. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत फडणवीस यांनी 'पहाटेच्या शपथविधी'मागील दडलेला घटनाक्रम उलगडला.

2019 ची निवडणूक आम्ही शिवसेनेसोबत लढविली होती. जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला होता. भाजपचे आमदार शिवसेनेच्या दुप्पट होते. त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्रिपदावर आमचाच दावा होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आमचा विश्वासघात केला. त्यांचे मुख्यमंत्रिपदावर हक्क सांगणे अनाकलनीय होते. दोन्ही काँग्रेसबरोबर जाण्याचा त्यांचा निर्णय पूर्वनियोजितच होता, असे फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने युती तोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात अन्य पक्षांशी आघाडी करून सरकार स्थापण्यासंदर्भात काही निर्णय होणे गरजेचे होते. कारण, पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणे कोणालाच परवडणारे नव्हते. त्यामुळेच राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापनेचा पर्याय समोर आला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून आमच्यासोबत हातमिळवणी केली, असे भासवले गेले; पण वस्तुस्थिती तशी नव्हती. शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय झाला होता. त्यांच्याशी आमची बैठकही झाली होती. सगळे काही चर्चा करून ठरले होते. त्यांनी सरकार स्थापनेला संमतीही दिली होती. मात्र, पवार यांनी आमच्याशी डबल गेम केला. शपथविधीपूर्वी दोन दिवस अगोदर त्यांनी आपला निर्णय फिरविला आणि पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यानंतरही ठरल्याप्रमाणे आमचा शपथविधी पार पडला; पण पवार यांच्या डबल गेममुळे हे सरकार टिकू शकले नाही, असा घटनाक्रम फडणवीस यांनी या मुलाखतीत सांगितला.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ केले. ही अनैसर्गिक आघाडी होती. ती फार काळ चालणार नाही, हे आम्हालाही माहीत होते आणि घडलेही तसेच. दोन्ही काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय शिवसेनेतील अनेक नेत्यांना रुचलेला नव्हता. त्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारले, असे फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत राज्याचा विकास पूर्णपणे ठप्प झाला. परिणामी, वर्षभरापूर्वी आम्ही शिवसेनेतील शिंदे गटासोबत सरकार स्थापन केले तेव्हा आम्हाला अनेक कठीण आव्हानांचा सामना करावा लागला, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news