

मुंबई : काहीही झाले तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबई महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले. भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात फडणवीस यांनी मागील दहा वर्षांत केलेल्या विकासकामांची जंत्री मांडली. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी कोविड काळात आपल्याच नातेवाइकांना कंत्राटे देत माणसे मारली, त्या मृतांसाठीच्या बॉडीबॅग खरेदीत भ्रष्टाचार करणार्या कफनचोरांनी आम्हाला प्रश्न करू नयेत, असा टोलाही लगावला. बेस्टच्या निवडणुकीत यांच्या ब्रँडचा बँड वाजल्याचे सांगत ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने कोणताही फरक पडणार नसल्याचेही अधोरेखित केले.
आगामी मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरळी येथील एनएससीआय डोम येथे मुंबई भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मुंबईतील भाजपचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागील महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर बसला असता, अवघ्या दोन जागा कमी होत्या. आपण सारी जुळवाजुळव केली होती. मात्र, मैत्रीच्या नात्यासाठी आपण महापौर पद उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे नर्व्हस आणि नाराज असून महापौर पद मिळावे म्हणून मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांनी फोन केल्याचा गौप्यस्फोटही केला. मात्र, मैत्रीच्या नात्यात आपण त्याग केला आणि 2019 साली उद्धव ठाकरेंमुळे अच्छा सिला दिया तुने .. म्हणायची वेळ माझ्यावर आली, असेही फडणवीस म्हणाले. मात्र, त्याला 2022 साली गनिमी काव्याने आणि 2024 साली पूर्ण बहुमताचे सरकार आणून चोख उत्तर दिल्याचेही फडणवीस म्हणाले.
ठाकरे बंधूंच्या संभाव्य राजकीय युतीच्या चर्चांच्या संदर्भात फडणवीस म्हणाले की, साधी बेस्टची निवडणूक होती, त्यात आमचा ब्रँड म्हणत त्यांनी निवडणूक लढवली. आमच्या शशांक राव आणि प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी त्यांच्या ब्रँडचा बँड वाजविला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनीही आपले विचार मांडले.
मुंबईच्या विकासाचे एक वाक्य दाखवा आणि शंभर रुपये मिळवा
काहीजण रोज सकाळी उठून मोदींना प्रश्न विचारतात, अशांना मुंबईकरांनी प्रत्येक निवडणुकीत उत्तर दिले आहे. मुंबई ही भाजपची, मुंबई ही भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना युतीची आहे. मुंबईकरांच्या विकासाचे कोणतेच व्हिजन ठाकरे गटाकडे नाही. त्यांची मागची दहा भाषणे काढा आणि त्यात मुंबईकरांच्या विकासासाठी केलेले एक विधान दाखवा, मी तुम्हाला शंभर रुपये देईन. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
मुंबईची काय अवस्था तुम्ही करून ठेवली?
वर्षानुवर्षे हाती सत्ता असूनही या मुंबईची काय अवस्था तुम्ही करून ठेवली? या मुंबईसोबत कोणीही स्पर्धा करू शकत नव्हते, पण यांनी शहराचा विकास केला नाही. त्यामुळे आयटीसारखे उद्योग इतर शहरात गेले. गेल्या 10 वर्षांत मोदींच्या नेतृत्वात आम्ही असे इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले आहे की, आता मुंबईसोबत कोणीही स्पर्धा करू शकत नाही. आयटी, स्टार्टअप आता मुंबईत आले. पुढच्या काळात डेटा सेंटर क्रांती घडविणार आहे. आज भारतात जेवढी डेटा सेंटरची कपॅसिटी तयार झाली आहे, त्यापैकी 60 टक्के ही मुंबईत आहे, असे फडणवीस म्हणाले.
10 लाख लोकांना धारावीमध्येच घरे देणार
धारावीचे काहीही होऊ शकत नाही म्हणत होते. पण आज जगातील सगळ्यात मोठा प्रकल्प म्हणून हा धारावीचा प्रकल्प सुरू झाला आहे. 19 लाख लोकांना इथे आम्ही घरे देत आहोत. आम्ही विचार केला की, धारावी ही केवळ वस्ती नाही, तर इथे अनेक छोटे उद्योग सुरू आहेत आणि म्हणून धारावीतील उद्योगांना धारावीमध्येच जागा दिली. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम आपण केले आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी प्रकल्पाचे समर्थन केले.
प्रवीण दरेकरांच्या तिहेरी कामगिरीचे कौतुक
भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी बजावलेल्या तीन कामगिरींचे विशेष कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले, आमच्या प्रवीण दरेकरांच्या पाठपुराव्यानंतर आता अभ्युदय नगरमध्ये राहणारा माझा गिरणी कामगार, आमचा मराठी माणूस ज्याच्या कष्टावर ही मुंबई उभी राहिली, त्या माझ्या मुंबईकराला 550-600 स्वेअर फूट जागा देण्याचा निर्णय आम्ही केला. त्याचेही काम आता आम्ही करतो आहोत, असेही फडणवीस म्हणाले. आज संपूर्ण मुंबईत सामान्य माणसाच्या घराचा प्रश्न सोडविण्याकरिता दरेकरांच्या पुढाकाराने आपण स्वयंपुनर्विकासाची योजना आणली. आज 1600 प्रकल्प स्वयंपुनर्विकासात निघाले.
हजारो लोकांना आपल्या स्वप्नातले मोठे घर मिळते आहे, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, साधी बेस्टची निवडणूक होती, त्यात आमचा ब्रँड म्हणत त्यांनी ही बेस्ट पतपेढीची निवडणूक लढवली. मात्र, आमच्या शशांक राव आणि प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाडांनी त्यांच्या ब्रँडचा बँड वाजविला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते, तुम्ही ब्रँड नाही. नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही, अशी बोचरी टीकाही फडणवीस यांनी केली. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रँड बनू शकतो, आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईचा रंग बदलण्याचा डाव हाणून पाडू ः अमित साटम
मुंबईच्या विकासाबरोबरच इथल्या सुरक्षिततेवरही भाजप लक्ष केंद्रित करणार आहे. मुंबईचा रंग बदलण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल. जर, शिवसेना उबाठा गट सत्तेत आला, तर एखादा खान मुंबईचा महापौर होईल,पण आम्ही ते होऊ देणार नाही. तीस वर्षांत त्यांनी पालिकेत 3 लाख कोटींची लूट केली असल्याचा घणाघाती आरोप मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी यावेळी केला.
अमित साटम यांनी शिवसेना ठाकरे गटाला लक्ष्य केले. मुंबईचा रंग बदलण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल. आज अनेक पाश्चिमात्य देशांतील अनेक आंतरराष्ट्रीय शहरांचे रंग बदलताना आपण पाहतोय. मुंबईतही असेच प्रयत्न सुरू आहेत. असे प्रयत्न आपण यशस्वी होऊ देणार नाही. गेल्या 11 वर्षांत राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मुंबईचा विकास झाला आहे, तोच विकास महापालिकेच्या माध्यमातूनही झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देऊ. मुंबईकरांची सुरक्षितता सुनिश्चित करू आणि मुंबईची ओळख टिकवण्यासाठी तसेच ती संरक्षित करण्यासाठी प्रयत्न करू, असे साटम म्हणाले. वर्सोवा किंवा मालवणीमध्ये दिसलेल्या पॅटर्नमुळे शहर उद्ध्वस्त होऊ शकते. जर शिवसेना यूबीटी सत्तेत आली, तर एक खान या मुंबईचा महापौर होईल. पण आपण ते होऊ देणार नाही, असे साटम म्हणाले.