

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरेंची अवस्था 'ना घर का ना घाट का' अशी झाली आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 'बाळासाहेबांच्या विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक' असा टोलाही त्यांनी यावेळी ठाकरेंना लगावला. तसेच येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका आमची शिवसेना जिकणारचं, असेही ते यावेळी म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (दि.२३) ९९ वी जयंती आहे. यानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुंबईतील बीकेसीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, गेल्यावेळी ग्रामसभा ते विधानसभा असा नारा दिला होता. आता महापालिका ते ग्रामसभा आपल्याला काबीज करायच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतदेखील विधानसभेसारखा विजय मिळवायचा आहे. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे विचार आणि जयंती हेच फक्त आठवते. बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना आम्ही बोलवणार नाही, असे स्मारकात गेल्यानंतर ते म्हणाले होते. मात्र त्यांनी २०१९ ला बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं पाप केलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकांत जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.