Mumbai Self Redevelopment Model: ‘स्वयंंपुनर्विकास’ योजनेची माहिती घेण्यासाठी दिल्ली सरकारचा उच्चस्तरीय अभ्यासगट मुंबईत

स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना भेट, रहिवाशांशीही साधला संवाद
Mumbai Self Redevelopment Model
Mumbai Self Redevelopment ModelPudhari
Published on
Updated on

मुंबई: महायुतीने धोरण म्हणून स्वीकारलेल्या आणि मुंबईत झपाट्याने लोकप्रिय झालेल्या स्वयंपुनर्विकास योजनेने राजधानी दिल्लीचे लक्ष वेधून घेतले असून या योजनेचा इत्थंभूत अभ्यास करण्यासाठी दिल्ली सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक अभ्यासगट मुंबईत येऊन गेला.

दिल्लीच्या या अभ्यासगटाने शुक्रवारी महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/ समूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या वांद्रे येथील कार्यालयात झालेल्या प्रदीर्घ बैठकीत स्वयंपुनर्विकास संकल्पना समजून घेतली.

या बैठकीला दिल्ली सरकारच्या अभ्यासगटाचे प्रमुख आय. राजा बाबू, स्पेशल को-ऑपरेशन रजिस्ट्रार, राकेश कुमार, डेप्युटी रजिस्ट्रार, विनोद कुमार मिश्रा, डेप्युटी सेक्रेटरी, स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे विशेष कार्य अधिकारी सुदेश रोझेकर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट हर्षद मोरे, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी कृष्णा पोटे व यतीन नाईक, सहकार विभागाचे उपनिबंधक संदीपान माटे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Mumbai Self Redevelopment Model
Bakipur By Election: प्रशांत किशोर आमदार होणार? बाकीपूर पोटनिवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष

स्वयंपुनर्विकासाची सुरुवात कशी झाली, ही योजना गृहनिर्माण सोसायट्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मुंबईत १६०० हून अधिक सोसायट्यांमध्ये प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या बैठका, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी, सभासदांसाठी आयोजित केलेले असंख्य मेळावे आणि या माध्यमातून जनतेमध्ये झालेला स्वयंपुनर्विकास संकल्पनेचा प्रसार याची माहिती स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाने अभ्यासगटासमोर या बैठकीत मांडली.

Mumbai Self Redevelopment Model
Sheena Bora Case: शीना बोरा हत्या प्रकरणात नवा पेच; महत्त्वाची कागदपत्रे गायब झाल्याची सीबीआयची माहिती

स्वयंपुनर्विकास योजना स्वतः मुंबई बँकेने पुढाकार घेऊन सुरू केली, मुंबईत यशस्वीरीत्या अनेक प्रकल्प पूर्ण केले, सरकारकडे पाठपुरावा करून स्वयंपुनर्विकासासाठी सवलती मिळवून दिल्या आणि त्यानंतर राज्य शासनाने स्वयंपुनर्विकास योजना राबवण्यासाठी मुंबई बँकेची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक केली. स्वयंपुनर्विकासातील समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नियुक्त केला.

राज्यभर दौरे करून हाऊसिंग सोसायट्यांशी संवाद साधून दरेकर अभ्यासगटाने केलेल्या महत्त्वपूर्ण शिफारशी स्वीकारत राज्य शासनाने स्वतंत्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापन केली. हा योजनेचा प्रवास दिल्ली सरकारच्या अभ्यासगटाने समजून घेतला. स्वयंपुनर्विकासात गृहनिर्माण संस्था, बँक, प्राधिकरण, पीएमसी, महानगरपालिका, शासन यांची भूमिका, प्रकल्पांचे तांत्रिक व आर्थिक नियोजन याचे सादरीकरणही प्राधिकरणाने या बैठकीत केले.

राज्य शासनाने स्वयंपुनर्विकासासाठी निर्गमित केलेले सर्व शासन निर्णय, दरेकर अभ्यासगटाचा अहवाल, स्वयंपुनर्विकास प्रकल्पांची यशोगाथा, स्वयंपुनर्विकास संकल्पनेवरील विस्तृत टिप्पणी आणि विविध कागदपत्रांचा संच यावेळी दिल्लीच्या अभ्यासगटाला देण्यात आला.

पुन्हा मुंबईत येणार

अभ्यासगटाचे प्रमुख आय. राजा बाबू यांनी सांगितले की, मुंबईत आणि महाराष्ट्रात स्वयंपुनर्विकास मॉडेल यशस्वी झाल्यामुळे या मॉडेलची माहिती घेण्यासाठी दिल्ली सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हा अभ्यासगट गठित केलेला आहे. आमचा अहवाल सादर करण्यापूर्वी दिल्लीत येऊन दिल्ली सरकारचे संबंधित मंत्री आणि विभागासमोर पुन्हा सादरीकरण करावे, अशी विनंती आम्ही स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाला केली आहे. दरम्यानच्या काळात आम्ही पुन्हा मुंबईत येऊन स्वयंपुनर्विकास मॉडेलचे प्रणेते, प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचीही भेट घेऊन मार्गदर्शन घेणार आहोत.

जुन्या दिल्लीत अनेक इमारती जुन्या व मोडकळीस आलेल्या आहेत, त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर आहे. इमारतींचा पुनर्विकास मुंबईच्या धर्तीवर स्वयंपुनर्विकासातूनच करण्याचा दिल्ली सरकारचा मानस आहे.गृहनिर्माण क्षेत्रात एक मोठे काम प्राधिकरणाचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांच्या पुढाकारातून उभे राहिले आहे. आम्हीही त्याच आधारावर दिल्लीत स्वयंपुनर्विकास करू शकतो, हा विश्वास आम्हाला मुंबईतील बैठकीतून मिळाला.

- आय. राजा बाबू, प्रमुख, स्वयंपुनर्विकास अभ्यास गट दिल्ली सरकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news