

Deepika Padukone Mumbai air pollution
मुंबई: मुंबईतील हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेवर अभिनेत्री दीपिका पदुकोणने चिंता व्यक्त केली आहे. यावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी तातडीने प्रतिक्रिया देत, महापालिका प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट केले आहे.
गुरुवारी दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मुंबईच्या 'एअर क्वालिटी इंडेक्स'चा एक स्क्रीनशॉट शेअर केला होता. यात तिने बृहन्मुंबई महानगरपालिकेला टॅग करत विचारले, "शहर गुदमरतेय, हे कसं काय चालतंय?" दीपिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आणि मुंबईकरांनीही या समस्येवर संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली.
अभिनेत्रीच्या या सवालावर महापौर रितू तावडे म्हणाल्या की, "केवळ दीपिका पदुकोणच नाही, तर सर्वच मुंबईकरांनी व्यक्त केलेल्या चिंतेची आम्ही दखल घेत आहोत. शहरातील प्रदूषणाची पातळी वाढली आहे हे वास्तव असून पालिका प्रशासन सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहे."
महापौरांनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली आहे. बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांसाठी 'स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर' जारी करण्यात आली आहे. बांधकामाच्या ठिकाणी धूळ आणि प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे बंधनकारक केले आहे. विकासकांना बांधकाम साइटवर हवेची गुणवत्ता दर्शवणारे डिजिटल डिस्प्ले बोर्ड लावण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी विकासकांसह सरकारी प्रकल्पांनाही 'स्टॉप-वर्क' नोटीस बजावण्यात येत आहेत.
शुक्रवारी 'समीर' ॲपवरील नोंदीनुसार मुंबईचा AQI ९५ होता, मात्र खासगी प्लॅटफॉर्मवर तो १५० (मध्यम प्रदूषित) नोंदवला गेला. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनुसार, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दिसणारी कमी दृश्यमानता ही धुक्यामुळे आहे. हवेतील वाढता ओलावा आणि प्रदूषके एकत्र आल्यामुळे 'स्मॉग'ची स्थिती निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.