आता केसरकरांचेही मुंबई महापालिका मुख्यालयात कार्यालय

दीपक केसरकर
दीपक केसरकर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या कार्यालयानंतर आता मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचेही कार्यालय मुंबई महापालिका मुख्यालयात सुरू होणार आहे. आज बुधवारी (दि. ४) ते या कार्यालयाचा प्रत्यक्ष ताबा घेणार आहेत.

पालकमंत्र्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंध असताना, मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पालकमंत्र्यांसाठी मुख्यालयात दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या नावाखाली राज्य सरकारची पालिका मुख्यालयात होणाऱ्या या घुसखोरीबद्दल काँग्रेस, समाजवादी पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना दालन व कार्यालय उपलब्ध करून दिल्यानंतर मुंबईतील शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयातील कार्यालयासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच मागणी लावून धरली. त्यानुसार मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महापालिका प्रशासनाकडे कार्यालयाची मागणी केली.

प्रशासनानेही वेळ न दवडता तातडीने शिक्षण समिती अध्यक्ष बसत असलेले दालन केसरकर यांच्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. आज बुधवारी (दि. ४) दीपक केसरकर हे कार्यालय ताब्यात घेणार आहेत. एवढेच नाही तर दर बुधवारी एक ते चार या वेळेत स्वतः केसरकर मुंबईकर नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. इतर वेळी कार्यालयाचा ताबा शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांकडे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर पालकमंत्र्यांना दालन उपलब्ध करून देण्यात येत असेल तर, विधानसभेतील घटनात्मक पद असलेल्या विधानसभा अध्यक्षांना महापालिका मुख्यालय दालन का नाही, असा खोचक प्रश्नही राजा यांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news