

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : RTE Admission : शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या आरटीई प्रवेश प्रक्रीयेसाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. मुदतवाढ म्हणून एक आठवड्याचा कालावधी प्रवेश प्रक्रियेसाठी देण्यात यावा, अशी मागणी पालक व विविध शिक्षण संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानुसार मुदतवाढीचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.
शिक्षण विभागाने फेब्रुवारीमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते. यावर न्यायालयात सुनावणी झाली. ज्यात शिक्षण विभागाने केलेला बदल न्यायालयाने घटनाबाह्य ठरवला. त्यामुळे शिक्षण विभागाला पूर्वीप्रमाणेच आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुमारे दोन महिने चालल्याने यंदा प्रवेश प्रक्रियेला विलंब होणार आहे.
शिक्षण विभागाकडून आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रीयेचा आढावा घेतला असता, प्रवेशासाठी मुदतवाढ देणे आवश्यक असलयाचे दिसून येते असल्याने 1 ऑगस्ट ते 5 आगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व क्षेत्रिय अधिकारी यांनी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी देण्यात आलेली मुदतवाढ लक्षात घ्यावी. तसेच यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
आरटीई प्रवेश प्रक्रियेतून निवड झालेल्या पाल्यांचे प्रवेश 31 जुलै पर्यंत करण्यास मुदत देण्यात आली आहे. असे असताना आज अखेर आरटीई प्रवेशासाठी निवड झालेल्या 93 हजार 9 पैकी केवळ 39 हजार 313 पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. परिणामी जवळपास 60 टक्के पाल्यांचे प्रवेश बाकी आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी एक आठवड्याची मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. राज्यात आरटीई प्रवेशासाठी 9 हजार 217 शाळांमध्ये 1 लाख 5 हजार 242 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी राज्यातून 2 लाख 42 हजार 516 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी 93 हजार 9 विद्यार्थ्यांची लकी ड्रॉच्या माध्यमातून झाली निवड आहे. प्रवेशासाठी 93 हजार 9 विद्यार्थ्यांची निवड होऊन देखील केवळ 39 हजार 313 विद्यार्थ्यांचे आतापर्यंत प्रवेश कन्फर्म झाले आहेत. म्हणेजच, निवड झालेल्यांपैकी तब्बल 53 हजार 696 पाल्यांचे अर्ज अजूनही कन्फर्म झालेले नाहीत. त्यामुळे RTE प्रवेशासाठी शिक्षण विभागाने 5आगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.