

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या, गुरुवारी शिवसेनेच्या दोन्ही गटांचा स्वतंत्र दसरा मेळावा होत आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर हा पहिलाच मेळावा असून या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडून राजकिय धुरळा उडण्याची शक्यता आहे.
मुंबईत अधूनमधून पाऊस सुरु असल्याने दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट कायम आहे. मैदानावर चिखल आणि पाण्याचे तळे साचले असले तरी ठाकरे गटाने पावसाला न जुमानता शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. आजच्या मेळाव्यासाठी मुंबई, ठाण्यासह पालघर, नवी मुंबई, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने येणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा गोरेगावच्या नेस्को मैदानात मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी फक्त मुंबई महानगर प्रदेशातील शिवसैनिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीतील यशाने शिंदे गटाचा आत्मविश्वास दुणावला असून, एकनाथ शिंदे आजच्या मेळाव्यात मुंबई महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना देण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश आपल्या सैनिकांना देताना उद्धव ठाकरेंना लक्ष्य करतील.
राज्यातील अतिवृष्टी आणि पुराच्या अस्मानी संकटाने शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे, त्यावरून सरकारला धारेवर धरतानाच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करतील.