

मुंबई : राज्यातील दुकाने, मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृहांसह इतर व्यावसायिक आस्थापना 24 तास सुरू ठेवता येणार आहेत. उद्योग विभागाने बुधवारी यासंदर्भातील स्पष्ट सूचनांचे परिपत्रक जारी केले आहे. तसेच, पोलिसांसह स्थानिक प्रशासनाला या आस्थापनांना प्रतिबंध करता येणार नसल्याच्या स्पष्ट सूचना केल्या आहेत. मात्र, जिथे दारू विक्री केली जाते अशी मद्यपानगृहे, बार, परमिट रूम, हुक्कापार्लर, देशीबार, डिस्कोथेकना यातून वगळण्यात आले असून, त्यांच्या वेळांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
शासनाच्या परिपत्रकानुसार, आठवड्यातील सर्व दिवस 24 तास आस्थापने सुरू ठेवता येणार आहेत. मात्र, तेथील कर्मचार्यांना 24 तास सलग विश्रांती मिळेल, अशी साप्ताहिक सुट्टी देणे बंधनकारक असेल. कामांच्या ठिकाणांबाबत असलेल्या दुकाने आणि आस्थापना अधिनियम 24 तास आणि आठवड्यातील सर्व दिवस कामकाज करण्याबाबतची तरतूद आहे. 2017 आणि 2020 मध्ये जारी केलेल्या आदेशातही तसे नमूद करण्यात आले आहे.
केवळ, दारू दुकाने, बार, परमिट रूम, हुक्कापार्लर, देशीबार आदी ठिकाणच्या वेळा मर्यादित ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, या नियमांची गल्लत करून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून दुकाने, मॉल्स आणि इतर आस्थापना रात्रीच्या वेळी सुरू ठेवण्यास प्रतिबंध केला जात होता. त्याबाबत राज्य सरकारकडे तक्रारी प्राप्त झाल्याने उद्योग विभागाने याबाबत स्पष्टता दर्शविणारे परिपत्रक नव्याने प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे कर्मचार्यांच्या साप्ताहिक सुट्टीचा नियम पाळून या सर्व आस्थापना 24 तास चालू ठेवता येणार आहेत. दारू दुकाने आणि बारसह मद्यविक्री करणार्या आस्थापना मात्र आखून दिलेल्या वेळेतच चालविता येणार आहेत.
दुकाने आणि आस्थापना अधिनियमात मध्यरात्री 12 ते पुढील 24 तास अशी दिवसाची व्याख्या करण्यात आली आहे. याच व्याख्येचा आधार घेत उद्योग विभागाने सर्व आस्थापना 24 तास चालू ठेवता येणार असल्याचे आपल्या परिपत्रकात नमूद केले आहे. शिवाय, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही केल्या आहेत. त्यामुळे यापुढे पोलिस आणि स्थानिक प्रशासनाला ही दुकाने अथवा आस्थापना बंद करण्याचा आग्रह करता येणार नाही.