

मुंबई: पार्किंगमुळे होत असलेली दादरची वाहतूक कोंडी सोडवण्याचा पथदर्शी प्रयोग मुंबई महापालिकेने हाती घेतली आहे. येथील नो पार्किंग धोरणाची कडक अमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. यासाठी जगन्नाथ सावंत मार्गावरील सार्वजनिक वाहनतळाचा ‘मॉडेल पार्किंग’ म्हणून विकास केला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरात इतरत्र हेच धोरण राबवण्यात येणार आहे.
या वाहनतळावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून, अतिरिक्त प्रकाशव्यवस्था व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महिला वाहनचालकांना सुरक्षित वाटावे यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मुंबई महानगरात विविध ठिकाणी एकूण ३७ वाहनतळे असून ३० हजार १३५ वाहनांच्या पार्किंगची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. मात्र वाहनचालकांकडून या वाहनतळांचा वापर होत नसून नो पार्किंगमध्येच वाहने उभी केली जात आहेत.
त्यामुळे महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पार्किंग धोरणाची आता कडक अमलबजावणी करण्याचे निर्दे दिले आहेत. दादर पश्चिमेतून या मोहिमेची सुरुवात होत आहे. यासाठी जगन्नाथ सावंत मार्गावरील वाहनतळात ‘मॉडेल पार्किंग’ उपक्रम राबविला जात आहे.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या या पथदर्शी प्रयोगाची माहिती दिली. वाहनचालकांच्या सोयीसाठी या वाहनतळात १ हजार तीनचाकी व चारचाकी तसेच १२ दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे. तर कोतवाल गार्डनसमोरील परिसर, कबुतरखाना, गणेश पेठ गल्ली तसेच टी. आर. सावंत मार्ग ते बाल गोविंददास मार्ग हा परिसर पूर्वीपासूनच ‘नो पार्किंग’ घोषित करण्यात आला आहे.
या भागात सध्या २०० हून अधिक ‘नो पार्किंग’ फलक लावण्यात आले असून त्यात आणखी वाढ करण्यात आली आहे. ‘मॉडेल वाहनतळ’ उपक्रमांतर्गत ‘नो पार्किंग’ क्षेत्र अधिक स्पष्टपणे दर्शविण्यासाठी रस्त्यांवरील दगडी कडा यांना गडद लाल व काळ्या रंगाचे पट्टे रंगविण्यात येत आहेत. तसेच सम - विषम दिनांकानुसार पार्किंगसाठी लाल व पांढऱ्या रंगाचे पट्टेही रंगविण्याचे काम सुरू आहे. वाहनतळाची उपलब्धता दर्शविणाऱ्या दिशादर्शक फलकांची संख्याही वाढविण्यातआली आहे.