

Marathi School |
मुंबई : दादर पश्चिमेला पोर्तुगीज चर्चजवळ असलेले इंडियन एज्युकेशन सोसायटीचे 'नाबर गुरुजी विद्यालय' येत्या १ मेपासून बंद होणार आहे. पटसंख्या कमी होत असल्याने शाळेच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रदिनीच दादरमधील नामवंत मराठी शाळा बंद होण्याची नामुष्की ओढवल्याने सोशल मीडियावर व्यवस्थापनाच्या निर्णयावर नाराजीचा सूर उमटत आहे.
'दादरमधील मराठी शाळा वाचवा', अशी मोहीम अनेक वर्षांपासून सुरू असली, तरी पूर्वीच्या मराठी शाळा आता एक एक करून बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शाळेत येणारे मराठी विद्यार्थी कमी झाले आहेत. अपुरी पटसंख्या हे कारण पुढे करून शासकीय व अनुदानित शाळा बंद होत आहेत. यात आता दादर येथील 'नाबर गुरुजी विद्यालय' शाळेचीही भर पडली आहे. गेली अनेक वर्षे शिक्षणाची सेवा देत असलेल्या या शाळेतील प्राथमिकनंतर आता माध्यमिक विभागातील वर्गही विद्यार्थ्यांअभावी संकटात आले आहेत. यंदा दहावीला येथे केवळ २४ विद्यार्थी होते, तर आठवीला ९ आणि नववीला ९ असे १८ विद्यार्थी उरले आहेत. यामुळे माध्यमिक विभाग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील काही विद्यार्थ्यांनी दाखलेही घेतले आहेत.
मराठी शाळा वाचवण्यासाठी विविध स्तरांवर मोहीम राबवली जात असली, तरी प्रत्यक्षात जुन्या व प्रतिष्ठित मराठी शाळांची अवस्था विद्यार्थी नसल्याने दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गेल्या काही वर्षांत पटसंख्या घटल्याने आता ही शाळा परवडत नसल्याचे कारण देत जुनी आणि नामवंत मराठी शाळा अस्तित्वाच्या संकटात सापडली असल्याने आता ही शाळा वाचवण्यासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत इंडियन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सतीश नायक यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते म्हणाले की, मराठी माध्यम विभाग टिकवण्यासाठी व चालू ठेवण्यासाठी शाळेने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले असले, तरीही माध्यमिक शाळेत मराठी विभागातील एकूण विद्यार्थीसंख्या ६०च्या खाली गेली आहे. यंदा ३५ विद्यार्थ्यांनी एसएससी बोर्डाच्या परीक्षेला हजेरी लावली आहे. निकालानंतर त्यांना शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. निकालानंतर, मराठी विभागात केवळ १५ ते १८ विद्यार्थी शिल्लक राहतील.