

ठळक मुद्दे
कबुतरखान्यांचा विषय हा वादाचा विषय नसून समाजाचा विषय आहे.
भांडण लावून देण्याचा काही लोकांचा प्रयत्न : हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही - मुख्यमंत्री
कबुतरखान्यांवरील बंदी तूर्तास कायम
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कबुतरखान्यांचा मुद्दा हा काही लोकांना संधी वाटू लागली आहे. त्यामुळेच या मुद्द्याच्या आडून एका समाजाच्या विरोधात दुसरा समाज किंवा एका भाषेविरोधात दुसरी भाषा, असे भांडण लावून देण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. मात्र, हा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कबुतरखान्यांचा विषय हा वादाचा विषय नसून समाजाचा विषय आहे. समाजाचे आरोग्य आणि समाजाच्या आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन यातून योग्य प्रकारे मार्ग काढायचा प्रयत्न करू, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कबुतरखान्यांवरील बंदी तूर्तास कायम ठेवत बुधवारी उच्च न्यायालयाने यासंदर्भात तज्ज्ञ समिती नेमण्याचे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कबुतरखाना विषयात लोकांचे आरोग्य अत्यंत महत्वाचे असून आरोग्याचे रक्षण झालेच पाहिजे. त्यासोबतच काही आस्थेचे विषय आहेत, त्याचीही काळजी घेता येऊ शकते. त्यातून मार्ग काढता येऊ शकतो. जिथे नागरी वस्ती नाही अशा भागात कबुतरांना अन्नधान्य पुरविण्याची व्यवस्था करता येऊ शकते. तर, मागच्या काळात नियंत्रित पद्धतीने काही ठरावीक वेळात कबुतरांना दाणे टाकण्याचा पर्याय चर्चेत आला होता. हा वादाचा विषय नाही, हा समाजाचा विषय आहे. समाजाचे आरोग्य आणि समाजाच्या आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे मार्ग काढायचा प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही लोकांना कबुतरखान्यावरून निर्माण झालेला वाद संधी वाटू लागल्याचा आरोपही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. काही लोकांना यातही महापालिका निवडणुकांची शक्यता दिसते आहे. त्यामुळे या विषयाला एका समाजाच्या विरोधात दुसरा समाज किंवा एका भाषेविरोधात दुसरी भाषा, असे स्वरूप देत वाद भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, असले प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. कारण, मुंबईची तशी प्रकृती नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.