

मुंबई : दादरचा कबुतरखाना मुंबई महापालिकेने पुन्हा ताडपत्रीने झाकला आहे. ताडपत्री काढल्यास गुन्हा दाखल केला जाईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे. याला जैन समुदायांनी तीव्र विरोध केला असून येत्या 13 ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कबुतरखान्यावरून आता पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने दादरच्या कबुतरखान्यावर कारवाई केली. 10 दिवसांपूर्वी पालिकेने हा कबुतरखाना पोलिसांच्या सुरक्षेत चारही बाजूंनी ताडपत्रीने झाकला. येथे कबुतरांना खाद्य घातल्यास कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला. पालिकेच्या या कारवाई विरोधात जैन समुदायाने आक्रमक होत तीव्र विरोध केला.
पालिकेने कबुतरखान्यावर बंदिस्त केलेली ताडपत्री जैन समुदायांनी फाडून टाकत कबुतरखाना उघडा केला होता. मात्र उच्च न्यायालयाने कबुतरखान्यावरील कारवाईचा आदेश कायम ठेवला. कबुतरांना दाणे टाकणार्यांवर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्यामुळे पालिकेने कबुतरखान्यावर कारवाई सुरुच ठेवली आहे.
वाद वाढणार
रविवारी रात्री पालिकेने पुन्हा दादरचा कबुतरखाना ताडपत्रीने झाकून बंदिस्त केला. येथे कबुतरांना खाणे टाकल्यास कारवाई केली जाईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे. यावरून जैन समुदाय आक्रमक होत येत्या 13 ऑगस्टला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दादरच्या कबुतरखान्यावरुन आता पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
मराठी एकीकरण समितीचे समर्थन
दादरसह इतर कबुतरखान्यांवर कारवाईचा आदेश न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे पालिकेने कबुतरखान्यावर कारवाई सुरु ठेवली आहे. या कारवाईला जैन मुनींसह जैन समुदायाने विरोध केला आहे, तर दुसरीकडे कबुतरखान्यावरील कारवाईच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीही 13 ऑगस्टला आंदोलन करणार आहे. त्यामुळे आता जैन समुदाय आणि मराठी एकीकरण समिती आमनेसामने येणार असल्याचे दिसून येत आहे.