मुंबई : न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने दादर येथील कबूतरखाना बंद केला आहे. मात्र, शहर व उपनगरात ठिकठिकाणी कबुतरांना दाणे टाकणे सुरूच आहे. त्यामुळे मुंबईकरांना असणारा कबुतरांचा धोका टळलेला नाही.
शहरात फोर्ट, गिरगाव, प्रार्थना समाज, मलबार हिल, वरळी, लोअर परेल, पश्चिम उपनगरात विलेपार्ले, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव, दहिसर, पूर्व उपनगरात मुलुंड, घाटकोपर, चेंबूर आदी परिसरात मोठ्या प्रमाणात कबूतरे दिसून येतात. अनेकजण उघडपणे कबुतरांना दाणे टाकले जात आहेत. परंतु अशांवर कारवाई होताना दिसून येत नाही. काही व्यापारीही सार्वजनिक ठिकाणी दाणे टाकत असल्यामुळे जेथे दाणे तेथे कबूतरखाने तयार होत आहेत.
कबुतरांना दाणे टाकणे व कबूतरखान्यावरून मुंबईकरानी जोरदार आवाज उठवला होता. कोर्टाचे आदेश असतानाही नवनवीन युक्त्या करून कबुतरांना दाणे टाकणे सुरूच होते. त्यामुळे महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यानंतर दादर कबूतर खाण्यात दाणे टाकण्याचे प्रमाण कमी झाले. परिणामी कबुतरांची संख्याही कमी झाली. त्यामुळे कबुतरखान्यांची चर्चा ही पूर्णपणे थांबली आहे. मात्र इतर ठिकाणी हा प्रकार सर्रास सुरू आहे.
तक्रारीनंतर होते कारवाई
कबुतराला दाणे टाकतेवेळी त्या व्यक्तीवर कारवाई करणे महापालिकेला शक्य होत नाही. कोण कधी दाणे टाकून जातो याची माहिती होणे अशक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी तक्रार केल्यानंतर जेथे दाणे टाकतात तेथे पाळत ठेवून दाणे टाकणार्यावर कारवाई करण्यात येते. पण हे प्रमाण अल्प असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
दाणे टाकण्याची ठिकाणे
चौक, जैन मंदिर परिसर, लोकवस्तीतील पदपथ, भुसारी दुकान परिसर, मार्केट, काही इमारतीच्या गच्ची