सुलोचना चव्‍हाण यांच्‍या निधनाबद्दल सुधीर मुनगंटीवार- छगन भुजबळांकडून शोक व्यक्त

सुलोचना चव्‍हाण
सुलोचना चव्‍हाण

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचनाताई चव्‍हाण यांच्‍या निधनाने लावणीचा अभिजात सूर हरपल्‍याची शोक भावना सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. बैठकीची लावणी किती समृद्ध असावी याचा वस्‍तुपाठ सुलोचना यांनी घालून दिला आहे. अनेक तमाशा प्रधान चित्रपटातून त्‍यांनी ठसकेबाज स्‍वरात लावण्‍या सादर केल्‍या आहेत. चपळ, फटकेबाज शब्‍दांना आपल्‍या आवाजाच्‍या, सुरांच्‍या माध्‍यमातून ठसका व खटका देण्‍याचे काम सुलोचना याच्या इतकं कोणीही उत्‍तम करू शकले नाही. पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्‍या मुखड्याची सुरूवात ठसकेबाजच झाली पाहिजेच, असे सुलोचना यांचे ठाम मत होते. आणि याचा प्रत्‍यय त्‍यांनी गायलेल्‍या लावण्‍यांतून येतोच, असेही त्यांनी म्हटले आहे.

सुलोचना लावणीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शास्‍त्रीय गायकीचे कोणतेही विधिवत शिक्षण न घेता दीर्घकाळ त्‍यांनी लावणीच्‍या माध्‍यमातुन रसिक प्रेक्षकांच्‍या मनावर उमटविलेला ठसा कधीही विसरू शकणार नाही. त्‍यांनी गायलेल्‍या लावण्‍यांनी जनमानसांच्‍या हृदयात मानाचे स्‍थान मिळविले आहे. लावणीला राजमान्‍यता, लोकमान्‍यता व प्रतिष्‍ठा मिळवून देणा-या सुलोचनाच्‍या निधनाने या क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असल्‍याचे सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्‍हटले आहे.

सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने कलासृष्टीची अपरमित हानी : छगन भुजबळ

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे दु:खद निधन झाल्याचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनाने कलासृष्टीची अपरमित हानी झाली आहे, अशा शब्दांत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोक व्यक्त केला आहे.

छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, लावणी आणि सुलोचनाताईंचे वेगळेच नाते होते. मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात त्यांनी एक वेगळीच भूरळ श्रोत्यांना घातली होती. फक्त चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुलोचना दीदीनी भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामिळ, पंजाबी आदी भाषांतील गीते गायिली. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना 'लावणीसम्राज्ञी' हा किताब प्राप्त झाला. त्यांनी केवळ लावण्याचं नाही, तर भावगीते आणि भक्तिगीतेद गावून लोकसंगीताचं दालन देखील समृद्ध केलं.

सुलोचना चव्हाण यांनी स्वत:ला समाजकार्यातही झोकून दिले होते. कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनातील मोठा हिस्सा धार्मिक संस्थांना तसेच गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भारत सरकारने त्यांना सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 'पद्मश्री' या नागरी पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या निधनाने कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं असून संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज हरपला आहे. मी व माझे कुटुंबीय चव्हाण कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असुन ईश्वर त्याच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटलं आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news