

मुंबई : महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन (एफडीए) राज्यातील सौंदर्य प्रसाधन उत्पादनांच्या किरकोळ विक्रेत्यांच्या नोंदणीची तयारी करत आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
सध्या एफडीएकडे किरकोळ कॉस्मेटिक विक्रेत्यांची कोणतीही माहिती नाही. काही विक्रेते बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री करत असल्याचा संशय आहे; मात्र एफडीएकडे थेट कारवाई करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अशा दुकानदारांवर लगाम घालण्याची तयारी एफडीएकडून सुरू आहे.
खाद्य विक्रेत्यांच्या धर्तीवर कॉस्मेटिक किरकोळ विक्रेत्यांना एफडीएच्या कार्यक्षेत्रात आणण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ) यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. यात सौंदर्य प्रसाधन विक्रेत्यांची अनिवार्य नोंदणी करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. सीडीएससीओकडून मंजुरी मिळाल्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात सौंदर्य प्रसाधन विक्रेत्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल.
एफडीए आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले की, औषध नियमांनुसार कॉस्मेटिक उत्पादने विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांसाठी परवाना बंधनकारक नाही. त्यामुळे एफडीएचे नियंत्रण किरकोळ विक्रेत्यांवर नाही. सध्या एफडीएकडे फक्त सौंदर्य प्रसाधन तयार करणाऱ्या कंपन्यांना परवाना देण्याचा अधिकार आहे. मात्र अनेक किरकोळ विक्रेते इतर राज्यांतून सौंदर्य प्रसाधन आणून विक्री करत आहेत. त्यामध्ये निकृष्ट दर्जाचे कॉस्मेटिक आणि अन्न-औषध उत्पादनेही असतात.