Pesa strike
आदिवासी भवनसमोर झालेल्या सभेत आदिवासी बांधवांसमोर बोलतांना माजी आमदार तथा आदिवासी नेते जे. पी. गावित. (छाया : हेमंत घोरपडे)

J P Gavit on Pesa strike | पेसा क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये बंद पाडा

सर्व शासकीय कार्यालये बंद पाडा: आदिवासी नेते जे.पी. गावित यांचे सभेत आदिवासींना निर्देश
Published on

नाशिक : पेसाभरतीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत सर्व शासकीय कार्यालये बंद पाडा, कामकाज रोखा, आदिवासींची ताकद सरकारला दाखवून देण्याची वेळ आली आहे. सरकार आपणांस केवळ गृहित धरते. आदिवासी गरीब असल्यामुळे सरकार आम्हाला किंमत देत नाही. मात्र आता आमची किंमत काय आहे हे सरकारला दाखवून देण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत पेसाभरती होत नाही तोपर्यंत सर्व शासकीय कार्यालये बंद करा, असा आदेश माजी आमदार तथा आदिवासी नेते जे. पी. गावित यांनी आदिवासी भवनसमोर झालेल्या सभेत आदिवासी बांधवांना दिले.

पेसा क्षेत्रातील 17 संवर्ग भरतीसाठी गेल्या 5 दिवसांपासून जे. पी. गावित आदिवासी विकास भवनमध्ये उपोषणाला बसले आहेत. शासनाला जाग आणण्यासाठी बुधवारी (दि.30) आदिवासी पेसा भरती कृती समितीतर्फे तपोवनातून आदिवासी विकास भवनपर्यंत उलगुलान मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चानंतर आदिवासी विकास भवनसमोर घेण्यात आलेल्या सभेमध्ये जे.पी. गावित बोलत होते. व्यासपीठावर आदिवासी नेते चिंतामन गावित, भास्कर गावित, जयंत दिंडे, खा. भास्कर भगरे, लकी जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जे.पी. गावित म्हणाले की, पेसा क्षेत्रात 2023 मध्ये 17 संवर्गात पेसा भरती करण्यात आली होती. मात्र ठाण्याचे रिटायर्ड उपजिल्हाधिकारी भालचंद्र ठाकरे यांनी 13 ऑक्टोबर 2023 ला सुप्रीम कोर्टात पेसा भरतीविरोधात याचिका दाखल केली. याचाच आधार घेऊन राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने त्याचदिवशी आदेश काढून भरती थांबविली. या याचिकेबाबत अद्यापपावेतो कुठलीही सुनावणी अथवा निर्णय झालेला नाही. तरीही शासनाने भरती थांबविली. ज्या दिवशी याचिका दाखल झाली त्याच दिवशी भरतीप्रक्रिया थांबविण्यात आली. याचाच अर्थ हे सर्व पुर्वनियोजित होते. आदिवासींच्या विरोधातील हा राज्य सरकारचा कुटील डाव आहे. सत्ताधारी आदिवासींना केवळ गृहित धरतात. त्यांच्या विकासाबाबत सरकार उदासीन आहे. आम्ही हा अन्यास सहन करणार नाही. पेसा भरती होत नाही, तोपर्यंत आदिवासी आंदोलन सुरुच राहणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

Pesa strike
Nashik News | आदिवासींच्या जमिनी हडपणाऱ्यांवर कारवाई

चिंतामन गावित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आदिवासी खात्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. सुरगाणा तालुक्यात दुधाळ गाईंऐवजी भाकड गाई देऊन आदिवासींची फसवणूक केली. आदिवासी विकास विभागात साधारण 300 अधिकारी, कर्मचारी काम करतात. मात्र त्यात केवळ 3 आदिवासी कर्मचारी आहेत. मग आदिवासींचा विकास कसा होणार? असा सवाल त्यांनी केला. यावेळी आदिवासी नेते भास्कर गावित, लकी जाधव, जयंत दिंडे आदींची भाषणे झाली.

ठिय्या आंदोलन रद्द

पेसाभरती होईपर्यंत आदिवासी विकास भवनसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार जे.पी.गावित यांनी व्यक्त केला होता. मात्र सभेत त्यांनी ठिय्या आंदोलनाऐवजी पेसा क्षेत्रातील शासकीय कार्यालये बंद करण्याच्या सुचना आदिवासींना केल्या. ठिय्या आंदोलन रद्द झाल्याने पोलिसांनी तसेच आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

logo
Pudhari News
pudhari.news