Maharashtra Politics |..तर विधान परिषदेच्या मैदानात काँग्रेसचा उमेदवार!

अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी
Maharashtra Politics
pudhari
Published on
Updated on

MVA Rift Legislative Council

नवी दिल्ली : प्रशांत वाघाये

शिवसेना ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना विधान परिषदेचे उमेदवार जाहीर केले, त्यामुळे काँग्रेसच्या गोटात काहीशी नाराजी आहे. या नाराजीचे परिवर्तन कशात होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ऐनवेळी काँग्रेस आपला उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेसचे एक वरिष्ठ पदाधिकारी दिल्लीत थांबले असून, फॉर्म घेण्यासाठी थांबल्याचे समजते. दरम्यान, महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीचा एकत्रित उमेदवार देण्याबाबत लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. त्या संदर्भात एक बैठक होईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात मित्रपक्षांशी काल सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

विश्वासात न घेता नाव जाहीर केल्‍याने नाराजी

महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या ३ पक्षांना एकच जागा मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनीच ही जागा घ्यावी आणि विधान परिषदेत जावे, यासाठी सर्व मित्र पक्ष आग्रही होते. मात्र, अचानक अंबादास दानवे यांचे नाव जाहीर करण्यात आले. यावर काँग्रेसच्या अंतर्गत गोटात तीव्र नाराजी आहे. आम्हाला विश्वासात न घेता नाव जाहीर करण्यात आले, हे चुकीचे आहे, अशी भावना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आहे.

Maharashtra Politics
Rajya Sabha election Maharashtra : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध

राज्यात लवकरच ७२ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती : हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या ‘संघटन सृजन’ प्रक्रियेतील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. राज्यात ७२ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली जाणार असून, महिला, मागासवर्गीय आणि सर्व समाजघटकांना यात प्रतिनिधित्व दिले जाईल. तसेच ११ विभागांमार्फत तालुका स्तरावर सुमारे ७ हजार पदाधिकाऱ्यांची फळी उभी राहणार असून, यात नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधला जाईल, असेही ते म्हणाले.

Maharashtra Politics
Vidarbha Election Politics : काँग्रेसचे नुकसान, नेतेच जबाबदार?

फडणवीस यांच्याकडून धीरेंद्र शास्त्री यांना राजाश्रय

बाबा आनंद स्वरूप आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावरून सपकाळ यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडून केले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धीरेंद्र शास्त्री यांना राजाश्रय दिला जात आहे. त्यांच्या वक्तव्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला हवी होती. संघानेही त्यांची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती, मात्र तसे झाले नाही. धीरेंद्र शास्त्री यांनी वक्तव्य केले होते, तेव्हा नितीन गडकरींसह अनेक दिग्गज मंचावर बसले होते. ते धीरेंद्र शास्त्रीशी सहमत आहेत का? संजय गायकवाड यांच्या वक्तव्याला एकनाथ शिंदे यांचा पीठांबा आहे का? असे प्रश्नही हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केले. राहुल सोलापूरकर, कोरटकर यांच्यावर कारवाई होत नाही, हा शिवाजी महाराजांच्या, फुले - शाहू - आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे आणि हा सगळा देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news