

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. काँग्रेस नेते दिल्लीत ठाण मांडून आहेत. ठाकरे गटाकडून काँग्रेसच्या जागांवर दावा केल्याने पेच वाढला आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समजते.
मुंबईत उत्तर भारतीय मते लक्षणीय आहेत. ही मते शिवसेना ठाकरे गटाकडे वळविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रणनिती आखली आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे. ज्या मतदारसंघात अल्पसंख्याकांचे मते अधिक आहेत. आणि तेथे काँग्रेसचे वर्चस्व आहे. तिथे ठाकरे गटाने दावा केला असताना समाजवादी पार्टीनेही या जागांवर दावा केला आहे. त्यातच समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीकडे १२ जागांची मागणी केली आहे. त्यामुळे यादव यांनी मागितलेल्या जागांवरही महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस आणि ठाकरे गट या जागा सपाला देऊ इच्छित नाहीत. या पार्श्वभूमी अखिलेश यादव यांच्याशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली जात आहे.
समाजवादी पार्टीने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून अबू आझमी, भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून रईस शेख, भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून रियाज आझमी आणि मालेगाव विधानसभा मतदारसंघातून शाने हिंद यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर सपाने धुळे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान, विदर्भातील १२ जागा ठाकरे गटाला देऊ नका, अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस अध्य७ मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे. तर मुंबईतील १७ जागावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये पेच निर्माण झाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यात विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची बातमी पसरली आहे. मात्र, शाह आणि राऊत यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना महाविकास आघाडीसोबतच आहे. काँग्रेस आणि शिवसेनेत वाद व्हावा, असे काहींचे षडयंत्र आहे, असे सांगत काँग्रेसचे नेते विजय वड्डेट्टीवार यांनी या चर्चांना विराम दिला. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा प्रश्न उद्या संध्याकाळपर्यंत सुटलेला असेल, असेही वड्डेट्टीवार यांनी सांगितले.
काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला म्हणतात, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही एकत्र आहोत. जागांबाबत बोलणी सुरू आहे, लवकरच ती सोडवली जाईल.