मुंबई : पुढारी वृत्तसेवा; शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) महायुती (Mahayuti) सरकारचा पंचनामा सादर करणार आहे. वांद्र्यातील एका हाँटेलमध्ये आज महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद बोलाविण्यात आली आहे. यात महायुती सरकारविरोधात 'पंचनामा' जारी केला जाणार आहे.
शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार आदी नेत्यांच्या उपस्थितीत चार पानी 'पंचनामा' जारी केला जाणार आहे. 'महाराष्ट्र धर्म बुडवला, गुजरात चरणी अर्पण केला, हे महायुतीचे महापाप' म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांना धडा शिकवू. या शाहू फुले आणि आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करूया. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत असून लेकी बाळी सुरक्षित नाहीत. शेतमालाला हमीभाव आणि पीक विमाही मिळत नाही. शेती अवजारांवर जीएसटी लावून शेतकऱ्यांना जीवन संपवायला लावले जात आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले जात आहेत. श्रीमंतांच्या गाडीखाली गरिबांना चिरडणाऱ्या खोपे सरकारला उघडे पाडू या. महाराष्ट्र सरकारची तिजोरी लुटून प्रत्येक कामात ३० टक्के कमिशन घेणाऱ्या सत्ताधारी खोकेबाजांचे पितळ उघडे करूया. जाती-धर्मात भांडण लावून महाराष्ट्रात दंगली घडवणाऱ्या महाराष्ट्र अस्थिर करणाऱ्या दंगलखोर सरकारला तडीपार करूया. अशी विविध आरोपांची मालिकाच या पंचनाम्यात मांडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
यासोबतच महायुती सरकारच्या काळात गरिबांशी निगडीत विविध घटकांवर १२ ते १८ टक्के जीएसटी लादला गेला. पण, हेलिकॉप्टर, क्रूझ जहाज, विमान आणि हिऱ्यावर अवघ्या पाच टक्के जीएसटी असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीने मांडलेल्या या पंचनाम्यात कथित रेट कार्डही जाहीर केल्या जाणार आहे. यात आमदार खरेदीसाठी ५० कोटी, नगरसेवक १ कोटी, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली १ कोटी, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या बदलीसाठी २५ लाखाचा दर असल्याचा आरोप करण्यात आल्याचे समजते. यासोबतच विविध बाबींचे दर फलकही यात मांडण्यात आल्याचे कळते.