Congress Municipal Election: दुर्लक्षित काँग्रेसची महापालिकांत पुनरागमन; 350 नगरसेवकांसह महापौरपदाकडे वाटचाल
मुंबई : नेत्यांची फौज नाही, पैशाची कमतरता आणि दुर्लक्षित केलेल्या काँग्रेसने राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत 350 नगरसेवक निवडून आणले. तसेच लातूर, भिवंडी आणि चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस महापौर बनविण्याच्या तयारीत आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली स्थानिक नेतृत्वाने ही कामगिरी केली आहे.
विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेसच्या प्रदेधाध्यक्षपदाची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपविण्यात आली. नवख्या सपकाळ यांना राज्यातील दिग्गज नेत्यांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही. मात्र सपकाळ यांनी पक्ष संघटनेत बदल केले. नव्याना संधी दिली. त्यांनी नगरपालिका निवडणुकीपासून राज्यभर दौरे केले त्यामुळे काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीत यश मिळाले त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये हुरूप आला. सपकाळ यांनी काँग्रेसच्या जिल्ह्याच्या नेत्यांना कोणासोबत आघाडी करायची, उमेदवार निवडीचे अधिकार दिले. तसेच सपकाळ हे राज्यभर फिरत होते. पण काँग्रेसचे दिग्गज नेते आपल्या जिल्ह्यातील महापालिकाही जिंकून आणू शकले नाहीत.
कोल्हापुरात काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी किल्ला लढविला. सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले. लातूरमध्ये अमित देशमुख यांनी महापालिकेची सत्ता काबीज केली. चंद्रपुर मध्ये विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला सर्वाधिक जागा जिंकून दिल्या आहेत. सपकाळ यांनी, पक्षात जान आणल्यामुळे या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. 29 महानगरपालिकापैकी काँग्रेस पक्षाला तीन महानगरपालिकांमध्ये महापौरपद मिळवण्याची स्पष्ट संधी निर्माण झाली आहे.
काँग्रेस पक्षाचे एकूण 350 नगरसेवक निवडून आले आहेत. जर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसने शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाशी निवडणूक लढवली असती तर किमान दहा महापालिका आघाडीने जिंकल्या असत्या, असे काँग्रेसच्या नेत्यांचे मत आहे. एमआयएमसह स्थानिक मुस्लिम पक्षांमुळे काँग्रेसचे अनेक महापालिकांमध्ये नुकसान झाले तरी दलित, आदिवासी, मुस्लिम आदी जनाधार पुनः काँग्रेसकडे वळविण्यात सपकाळ यांना यश आले आहे.

