

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
मुंबईची लढाई जिंकणे धर्मनिरपेक्ष शक्तीसाठी अत्यंत आवश्यक असल्याने महाआघाडी झाली नाही तरी शिवसेना उबाठा लढत असलेल्या काही जागांवर त्यांना पाठिंबा द्यावा आणि आपण लढत असलेल्या काही जागांवर त्यांचा पाठिंबा मागायला हवा असा प्रस्ताव काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत चर्चेला येणार आहे.
उद्या 26 रोजी होणाऱ्या काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत भाजपविरोधी मतांची एकत्र मोट बांधणे आवश्यक आहे. दलित-मुस्लिम ऐक्यात मराठी मतांची भर पडणे निकालाचे चित्र बदलणारे राहील, असे मत ज्येष्ठ काँग्रेसनेते मांडणार आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा देतानाच काँग्रेसच्या बाबतचा विचार करण्याचा मुद्दा समोर आला आहे.
लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी यासंबंधात सादर केली जाते आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसेला जाहीर विरोध करायचा, पण काही जागांवर शिवसेना उबाठाला पाठिंबा द्यायचा असा हा प्रस्ताव आहे. उद्धव ठाकरे यांचे उत्तम संबंध असलेले काँग्रेसमधील काही नेते या संदर्भात सक्रिय झाले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील शिवसेनेशी झालेली मैत्री सोडायला नको अशी भूमिका काही दिवसांपूर्वी घेतली होती.
राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा देणे योग्य नसल्याने आपण महाआघाडीत गेलो नाही.मात्र उबाठा-काँग्रेसमध्ये जेथे परस्परांना मते हस्तांतरित करता येतील अशा वॉर्डात पाठिंबा देण्याचा विचार जरूर करायला हवा असे कळवण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला उद्याच्या बैठकीत येतील काय हे स्पष्ट नाही, पण या मैत्रीपूर्ण पाठिंब्याचा उद्या विचार होईल.काँग्रेस समवेत जायला हवे असा विचार शिवसेनेतील काही नेत्यांना भावतो आहे.
कोल्हापूर, चंद्रपूर येथे शिवसेना उबाठा आणि काँग्रेस यांची युती झाली आहे त्यामुळे त्याच धर्तीवर मुंबईतील काही वॉर्डांमध्ये परस्परांना मदत करण्याचा मार्ग अवलंबणे योग्य ठरेल असा विषय दिल्लीत काँग्रेस मुख्यालयातही चर्चेला आला आहे. मनसे लढत असलेल्या वॉर्डांबाबत मात्र विरोध करण्यावर काँग्रेस ठाम आहे.हिंदी भाषकांची मते मिळवायची असतील तर त्यासाठी मनसेला विरोध करणे आवश्यक समजले जाते.
लोकसभा निवडणुकीत परस्परांना केलेल्या मदतीमुळे वर्षा गायकवाड आणि अनिल देसाई या दोन जागा काँग्रेस आणि शिवसेना उबाठाने जिंकल्या. धारावीतील मते काँग्रेसने शिवसेनेसाठी उभी केली आणि विले पार्ले परिसरातील मराठी मते शिवसेनेने वर्षा गायकवाड यांच्याकडे वळवली असे उदाहरण आज सांगितले जात होते.
उद्या होणाऱ्या संसदीय पक्षाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे या संदर्भात काही पुढाकार घेतील असे सूत्रांनी सांगितले. 29 महानगरपालिकांमध्ये जिथे जिथे शक्य आहे तेथे पुरोगामी विचाराच्या पक्षांनी धर्मनिरपेक्ष आघाडीसाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.
आज उद्धव ठाकरे यांनी पत्र परिषदेत ठाकरे-काँग्रेसचे ठरले आहे, असे विधान केले असले तरी शिवसेनेतही असा पाठिंबा मिळत असेल तर त्याचा विचार करणे योग्य ठरेल. त्यामुळे जिंकणाऱ्या जागांची यादी वाढेल असा मतप्रवाह पुढे आला आहे. मुंबई छाननी समितीत अमीन पटेल तसेच नसीम खान यांचा समावेश आहे. अस्लम खा शेखही सक्रिय आहेत. या मंडळींना अल्पसंख्याक समुदायात उद्धव ठाकरे काही ठिकाणी लोकप्रिय झाले आहेत हे लक्षात आले असून जेथे मराठी-मुस्लिम एकत्र येणे शक्य आहे तेथे फायदा होईल. शिवसेना उबाठाला पाठिंबा देण्याबाबत संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला जाईल, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने पुढारीशी बोलताना सांगितले.