

मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मुंबई प्रदेश काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत बुधवारी ईडी कार्यालयावर बुधवारी धडक मोर्चा काढला. ईडी ही नरेंद्र मोदी सरकारच्या इशार्यावर काम करत असून सोनिया गांधी व राहुल गांधी यांना चौकशीच्या नावाखाली त्रास देण्यात आला. भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना बदनाम करण्यात आले. ही कारवाई मोदी सरकारच्या इशार्यावर केल्याचा आरोप खासदार वर्षा गायकवाड यांनी या वेळी केला.
यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत व स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी बलिदान दिले आहे. त्याग केला आहे. त्यांच्यावर खोटे आरोप लावून बदनाम करण्याचे पाप करू नका. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ईडीनेही लक्षात ठेवावे. काँग्रेस नेतृत्वाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून चोख उत्तर देईल, असा इशारा यावेळी दिला.
मोर्चात आमदार माजी मंत्री अस्लम शेख, आमदार डॉ.ज्योती गायकवाड,अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव व तेलंगणाचे सह प्रभारी सचिन सावंत, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस,जिल्हाध्यक्ष रविकांत बावकर, कचरू यादव, केतन शाह, भावना जैन, अर्शद आझमी, राजपती यादव, ट्युलिप मिरांडा, सुभाष भालेराव, फरहान आझमी, अखिलेश यादव, राजेश शर्मा यांच्यासह कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
भाजपा सरकारने काँग्रेस नेतृत्वाला जाणीवपूर्वक व राजकीय सूडबुद्धीने गोवण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने निकाल दिला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चाला अडवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.