

नवी दिल्ली: काँग्रेस सरचिटणीस आणि खासदार प्रियंका गांधी यांना पक्षाचे नेतृत्व देण्यात यावे, अशी मागणी आता काँग्रेस मधूनच समोर आली आहे. सोबतच राहुल गांधी हे अनेक कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध नसतात आणि ८३ वर्षीय मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्व शैलीसोबत तरुणवर्ग पक्षापासून दूर जात आहे, असे पत्र एका काँग्रेस नेत्याने थेट सोनिया गांधींना लिहिले आहे.
ओडिशाचे काँग्रेस नेते आणि आमदार मोहम्मद मोकीम यांनी सोनिया गांधींना पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीबाबत तीव्र शब्दांत टीका करणारे पत्र लिहिले आहे. त्यांनी राहुल गांधींची अनुपलब्धता, ८३ वर्षीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची नेतृत्वशैली यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मोकीम यांनी आपल्या पत्रात लिहिले की, मी स्वतः जवळजवळ ३ वर्षांपासून राहुल गांधींना भेटू शकलो नाही. हे पत्र वैयक्तिक चिंतेमुळे नाही तर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत निर्माण झालेल्या भावनिक अंतरामुळे लिहिले आहे, असेही ते म्हणाले.
मोकीम म्हणाले की, नेतृत्व आणि तळागाळातील कार्यकर्त्यांमधील वाढत्या अंतरामुळे पक्ष कमकुवत झाला आहे. आमदार असूनही ते ३ वर्षे राहुल गांधींना भेटू शकले नाहीत. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या कार्यकाळात कार्यकर्त्यांचे कौतुक केले गेले आणि त्यांचे ऐकले गेले, ज्यामुळे पक्षावर विश्वास आणि निष्ठा वाढली. दुसरीकडे देशातील ६५ टक्के लोकसंख्या तरुण आहे मात्र सध्याचे नेतृत्व त्यांच्याशी संपर्क साधू शकत नाही. ८३ व्या वर्षी खर्गे यांची नेतृत्वशैली पक्षाला तरुणांपर्यंत पोहोचण्यापासून रोखत आहे.
मोकीम यांनी पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, देशातील तरुण लोकसंख्या प्रियंका गांधींच्या नेतृत्वाची वाट पाहत आहे. त्यांना मध्यवर्ती आणि सक्रिय भूमिका दिली पाहिजे. त्यांनी असेही सुचवले की, भविष्यात पक्षाचे नेतृत्व सचिन पायलट, डी. के. शिवकुमार आणि शशी थरूर यांसारख्या उत्साही नेत्यांकडे सोपवावे.
पत्रात मोकीम यांनी दीर्घकाळ दुर्लक्षामुळे काँग्रेस पक्ष सोडलेल्या तरुण नेत्यांचाही उल्लेख केला. ज्योतिरादित्य सिंधिया, मिलिंद देवरा, हिमंता बिस्वा शर्मा आणि जयवीर शेरगिल यांसारख्या प्रतिभावान नेत्यांनी पक्ष सोडला आहे, जो काँग्रेस पक्षातील असंतोष स्पष्टपणे दर्शवत आहे. महाराष्ट्र, बिहार, दिल्ली, हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरमधील मोठे पराभव हे केवळ निवडणुकीतील अपयशांचे परिणाम नव्हते तर संघटनात्मक कमकुवतपणा आणि चुकीच्या निर्णयांचे देखील परिणाम होते. बूथ-स्तरीय कार्यकर्त्यांना दुर्लक्षित वाटले, ज्यामुळे विजय अशक्य झाला, असेही ते म्हणाले.