

मुंबई : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कोल्ड्रिफ सिरप घेतल्यानंतर अकरा मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) सतर्क झाले आहे. एफडीएने राज्यभरात कोल्ड्रिफ सिरप औषधाच्या बॅच क्रमांक-१३ च्या वापरावर तातडीने बंदी घातली आहे. राज्यातील सर्व घाऊक व किरकोळ विक्रेते, वितरक आणि रुग्णालयांना हा बॅच वापरू नये तसेच तत्काळ जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हा सिरप खेसन फार्मा, सुंगुवरचाथिरम, कांचीपुरम जिल्हा (तामिळनाडू) येथे तयार करण्यात आला असून, प्राथमिक तपासणीत या बॅचमध्ये डायथिलीन ग्लायकोल नावाचे विषारी रसायन आढळले आहे. हे रसायन मूत्रपिंडावर गंभीर परिणाम करते, असे एफडीएकडून सांगण्यात आले. बॅचची उत्पादन तारीख मे २०२५ आणि एक्सपायरी एप्रिल २०२७ आहे.
छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथील काही लहान मुलांना उपचारासाठी नागपूर येथे आणण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान गुंतागुंत निर्माण झाली आणि शेवटी मृत्यू झाला. एफडीएने सांगितले की, तामिळनाडू औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधून या बॅचच्या पुरवठा साखळीचा मागोवा घेतला. जात आहे. महाराष्ट्रात सिरपचा पुरवठा झाल्याची नोंद सध्या नसल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व औषध निरीक्षक आणि सहाय्यक आयुक्तांना दुकाने व रुग्णालयांना अलर्ट करण्याचे तसेच स्टॉक आढळल्यास तो गोठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या महाराष्ट्रात या सिरपचा पुरवठा झाल्याची पुष्टी नाही, तरीही आम्ही पूर्ण सतर्कता ठेवली असून आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत. जनतेनेही काळजी घ्यावी आणि कोणताही धोका टाळावा.
राजेश नार्वेकर, आयुक्त, एफडीए
येथे साधा संपर्क
संदिग्ध सिरप किंवा साठा आढळल्यास नागरिकांनी खालील माध्यमांतून संपर्क साधावा.
टोल-फ्री क्रमांकः १८००-२२२-३६५
ईमेल: icho.fda-mah@nic.in