

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील दूषित कफ सिरपच्या घटनेनंतर राजस्थान, तामिळनाडूमध्ये दूषित कफ सिरपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थानमध्ये कायसान फार्माद्वारे पुरवलेल्या 19 औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. भरतपूर आणि सिकरमध्ये डेक्सट्रोमेथोरफान एचबीआर सिरपशी संबंधित दुष्परिणाम आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आरोग्य अधिकारी डॉ. पलक कुलवाल आणि फार्मासिस्ट पप्पू सोनी यांना हलगर्जीपणाबद्दल निलंबित करण्यात आले आहे, तसेच राज्य औषध नियंत्रक राजाराम शर्मा यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
भारताच्या औषध महानियंत्रकांनी सूचना जारी करून इशारा दिला आहे की, डेक्सट्रोमेथोरफान दोन वर्षांखालील मुलांना देऊ नये आणि सामान्यतः ते फक्त पाच वर्षांवरील मुलांसाठीच शिफारस केलेले आहे. राजस्थानच्या अधिकार्यांनी डॉक्टरांना या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
या मृत्यूनंतर, तामिळनाडू सरकारने देशभरात कोल्ड्रिफ सिरपच्या विक्रीवर बंदी घातली आणि ते बाजारातून काढून टाकण्याचे आदेश दिले. कांचीपूरममधील सुंगुवरचत्रम येथील उत्पादकाच्या युनिटमध्ये तपासणी करण्यात आली आणि डीईजी मिश्रणाच्या तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.
उत्तराखंड सरकारने पुढील बालमृत्यू टाळण्यासाठी मेडिकल स्टोअर्स आणि घाऊक औषध विक्रेत्यांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे आरोग्य सचिव आणि एफडीए आयुक्त डॉ. आर. राजेश कुमार यांनी औषध निरीक्षकांना रुग्णालये आणि दुकानांमधून कफ सिरपचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य वैद्यकीय अधिकार्यांना केंद्र सरकारच्या सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून सदोष औषधे बाजारातून काढून टाकली जातील.