

मुंबई : भाजपची ताकद आम्ही वाढवतच राहू. आम्ही कुठेही आपली ताकद कमी होऊ देणार नाही. मात्र त्याचवेळी मित्रपक्षांना सोबत ठेवण्याचा आमचा निर्णय आहे. महायुतीतील दोन्ही मित्रांची आम्हाला गरज आहे, असे माझे मत आहे. भविष्यात म्हणजे 2029 च्या निवडणुकाही आम्ही युतीनेच लढविणार आहोत.
ताकद वाढली म्हणून मित्रांना सोडून द्यायचे, असे आम्ही कधीच करणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महायुतीमधील संघर्षाला पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला. तसेच, येत्या चार-पाच दिवसांत राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांसाठीच्या जागावाटपाच्या चर्चेला सुरुवात होणार असल्याचेही सांगितले.
राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निमित्ताने महायुतीतील विसंवाद समोर आला. विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गटात अनेक ठिकाणी संघर्षाचे चित्र निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर मुंबईत एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीतील संघर्षासह हिंदी-मराठीचा वाद, महापालिका निवडणुकांसाठीचे जागावाटप, राज्याचे अर्थकारण आदी विषयांवर भाष्य केले.
भाजपची ताकद वाढवतच राहू, मात्र ताकद वाढली म्हणून मित्रपक्षांना सोडून द्यायचे असे आम्ही कधीच करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवसेना शिंदे गटासोबतच्या संघर्षाबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या घरात दोन भावांमध्येही प्रत्येक गोष्टीत एकमत असते असे नाही. काही गोष्टीत एकमत होत नाही. सगळ्याच गोष्टीत जर एकमत असते तर आम्ही वेगळे पक्ष कशाला राहिलो असतो, एकच पक्ष असतो. आम्ही तिघेही वेगवेगळे पक्ष आहोत. आमची काही मतमतांतरे आहे. मात्र, ब्रॉडर इश्शूजवर आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. प्रत्येक गोष्ट आपण कार्यकर्त्यांवर लादू शकत नाही. जेव्हा आमच्या निवडणुका असतात तेव्हा त्यांनी राबायचे आणि त्यांच्या निवडणुका आल्यावर निर्णय लादायचे, असे चालत नाही. त्यामुळेच स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी युती-आघाड्यांची वेगवेगळी समीकरणे पाहायला मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई महानगर क्षेत्रात मराठीची गळचेपी होत असल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईमध्ये मराठी माणसाची गळचेपी कुणीही करू शकत नाही आणि ती आम्ही होऊन देणार नाही. मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे. देशभरातील लोक येथे आले आहेत. पण मुंबई मराठी आहे आणि ती जन्मभर मराठीच राहील. मुंबईचे मराठीपण कुणीच घालवू शकत नाही. आमच्या सरकारने पुनर्विकासाची जी धोरणे आणली त्यामुळे मराठी माणसाला मुंबईतच घरे मिळणार आहेत. जुन्या धोरणांत मराठी माणसाला मुंबईबाहेर जावे लागत होते, ते आता बंद झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आपली अस्मिता, आपले मराठीपण, आपली मराठी भाषा आपण जपली पाहिजे. जे जपले जात नाही ते क्षीण होत जाते. आपली मराठी मातृभाषा आहे. मराठी भाषा शिकताना आणखी एक भारतीय भाषा शिकण्याने फायदाच होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही हिंदी भाषेच्या संदर्भात आग्रह धरला होता. एकीकडे हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करायचा आणि इंग्रजीला पायघड्या घालायच्या, असा प्रकार सुरू असतो. आपल्याच भारतीय भाषेला असा विरोध केला जातो जणू ती पाकिस्तानची भाषा आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी हिंदीविरोधी राजकारणाला फटकारले.