

मुंबई : पायाभूत सुविधा क्षेत्रात पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट राज्याने निश्चित केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिली. एकट्या मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षांत सुमारे ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईत आयोजित तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेचे उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी आर्थिक गुंतवणुकीबाबत सरकारने निर्धारित केलेल्या लक्ष्याची माहिती दिली. शाश्वतता, सक्षम वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांसाठी राहण्यायोग्य शहरे हे शहरी विकासाचे तीन महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शहरीकरण ही समस्या नसून विकासाची मोठी संधी आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये शहरांचा वाटा सुमारे ६५ टक्के असून, शहरे ही आर्थिक विकासाची इंजिने आहेत. त्यामुळे शहरीकरणाकडे ओझे म्हणून न पाहता विकासाची संधी म्हणून पाहण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू, हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंग, पश्चिम बंगालचे राज्यमंत्री उमेश राय, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांच्यासह विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तिसरी, चौथी मुंबई आकाराला येणार
महाराष्ट्राच्या भविष्यातील शहरी विकासाचे चित्र मांडताना मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईच्या निर्मितीचा उल्लेख केला. नवी मुंबई विमानतळ परिसरात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत असून, या ‘तिसऱ्या मुंबई’मध्ये एज्यु-सिटी, स्पोर्टस् सिटी, मेडि-सिटी, इनोव्हेशन सिटी आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर सिटी विकसित करण्यात येत आहे. तर, विरार ते वाढवण परिसरात चौथी मुंबई विकसित करण्यात येत आहे. वाढवण येथे देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक बंदर उभारले जात असून, ते जगातील दहा मोठ्या बंदरांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.