

मुंबई : राज्यात एकाही डान्स बारला परवाना देण्यात आलेला नाही. ऑर्केस्ट्रा बारला परवानगी आहे. मात्र ऑर्केस्ट्राच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारचा परवाना निलंबित केला जातो. यापुढे वारंवार नियम मोडणाऱ्या बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सुभाष देशमुख यांनी राज्यातील नियमबाह्य ऑर्केस्ट्रा बार आणि डान्स बारवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री आणि गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
भोयर यांनी सांगितले की, न्यायालयाच्या नियमांनुसार ऑर्केस्ट्रा बारला परवाने दिले आहेत. जेथे नियमांची पायमल्ली केली जात असेल, अशा प्रकरणांची गंभीर दखल घेऊन ज्या बारकडून तीनवेळा नियमांचे उल्लंघन होईल, त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
चर्चेदरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी पनवेलमध्ये रात्री लेडीज बारसारखे प्रकार सुरू आहेत. दिवसा हे ढाबे आणि बार बंद दिसतात. मात्र रात्री दोन्ही बाजूंनी लेडीज बार सर्रास चालताना दिसतात, असे निदर्शनास आणले. यावर सविस्तर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नियम मोडणाऱ्या बारचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत आमची बैठक झाली आहे.
तीन किंवा पाचवेळा उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाईल. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच सभागृहात आणला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.